हंटिंग्टन आजाराविषयी जनजागृतीसाठी पालिका मुख्यालयावर उद्या विशिष्ट रोषणाई

मेंदूवर परिणाम करणाऱ्या हंटिंग्टन आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विनंतीनुसार बुधवार ४ मे रोजी रात्री ८ वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

municipal elections will be held soon State Election Commission approved Mumbai ward structure
मुंबईच्या प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब, पालिका निवडणुका लवकर होणार

मेंदूवर परिणाम करणाऱ्या हंटिंग्टन आजाराविषयी जनजागृती व्हावी, यासाठी हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विनंतीनुसार बुधवार ४ मे रोजी रात्री ८ वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे. १२ मे रोजी चर्चगेट रेल्वे स्थानकावर आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस इमारतीवर, १४ मे रोजी वांद्रे वरळी सागरी सेतूवर, १६ मे रोजी ठाणे महापालिका मुख्यालयावर आणि १८ मे रोजी नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर याप्रमाणे त्या-त्या दिवशी रात्री ८ वाजता विशिष्ट रंगाची विद्युत रोषणाई केली जाणार आहे, अशी माहिती देखील हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडियाने दिली आहे.

हंटिंग्टन बाधित रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे हितचिंतक आणि तज्ज्ञांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि हंटिंग्टन बाधित रुग्णांसाठी कायम निदान आणि अधिक जोमाने आजाराशी लढण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी विनंती संस्थेने मुंबई महापालिकेकडे केली होती.

हंटिंग्टन आजार ही असाध्य अनुवांशिक स्थिती आहे. या आजारामुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यातून रुग्णांचे शारीरिक हालचालींवर नियंत्रण नसणे, व्यक्तिमत्वातील असाधारण बदल आणि अपुरी आकलन क्षमता अशाप्रकारची लक्षणे आढळून येतात. या आजाराने ग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी ‘हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर हंटिंग्टन डिसीज जागरूकता महिना ज्याप्रमाणे साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे हंटिंग्टन डिसीज सोसायटी ऑफ इंडिया यांनी देखील मे महिना हा ‘हंटिंग्टन आजार जागरूकता महिना’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे.

यामध्ये ‘लाईट इट अप फॉर एचडी’ नावाचा महत्वाचा उपक्रम समाविष्ट आहे. हंटिंग्टन आजाराने बाधित रुग्णांच्या कुटुंबासोबत आपले दृढ ऐक्य दर्शविण्यासाठी आणि वैद्यकीय मंडळी, सामान्य जनता तसेच धोरणकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, मुंबईतील प्रमुख इमारतींवर हंटिंग्टन आजारासाठी निर्देशित विशिष्ट निळ्या व जांभळ्या रंगाची वेगवेगळ्या दिवशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.


हेही वाचा – मुंबईतील मोठ्या मशीदींबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली