मुंबई : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. त्यावर लोकसभेत तीन दिवस चर्चा झाली. मोदी मंत्रिमंडळातील महाराष्ट्राचे एक मंत्री नारायण राणे यांनी अविश्वास ठरावाच्या वेळी लोकसभेत केलेले भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐकायला हवे. महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणारे ते भाषण होते, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा – ‘हे’ चांगल्या नेत्याचे लक्षण, मोदींचे कौतुक करत संजय राऊत यांची फडणवीसांना कोपरखळी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव हे उद्धव ठाकरे यांच्या कृपेने दोनदा खासदार झाले. त्यांनी संसदेत वापरलेली भाषा ही भाजपाच्या नव्या संस्कृतीला शोभणारी आहे आणि हेच लोक आता भाजपाच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहेत, असे भाकित खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या ‘रोखठोक’ सदरात केले आहे.
व्यक्तिकगत टीका कधीच नाही
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ने अशी भाषा कधी वापरली नाही. धोरणांवर टीका करणे हे वेगळे व खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे वेगळे. मोदी यांच्यावर कधीच व्यक्तिगत किंवा खालच्या पातळीवरची टीका ‘सामना’ने केली नाही. भाजपाचे ‘नागडे पोपटलाल’ शिवसेना नेत्यांवर करतात तसे कमरेखालचे वार व खोटे आरोप केले नाहीत, असा दावा खासदार राऊत यांनी केला आहे.
तुषार गांधी यांना पोलिसांना रोखले
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून गांधींनी ‘भारत छोडो’चा आदेश 9 ऑगस्ट 1942ला दिला. त्या क्रांतिस्तंभावर फुले वाहण्यासाठी गांधींचे पणतू तुषार गांधी पोहोचले. त्यांना पोलिसांनी रोखले; कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तेथे येणार होते व त्यांना सगळ्यात आधी तेथे फुले वाहायची होती, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – नेहरू वंशातील गांधीने मोदी सरकारला ‘चले जाव’चा संदेश दिला, संजय राऊतांची टीका
तोडगे काढायला पंतप्रधानांकडे वेळ नाही
देशातील समस्यांवरचे मूलभूत तोडगे कोणते याचा विचार करण्यास पंतप्रधानांकडे वेळ नाही. पेटलेल्या मणिपूरवर राहुल गांधी कडक बोलले. त्यांचे परखड बोलणे भाजपास पटणार नाही. राहुल गांधी आता दुसऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेला निघाले आहेत. गुजरातच्या गांधीभूमीवरून ती सुरू होईल व ईशान्येकडे निघेल. त्यात मणिपूर आहेच. त्यानंतर मोदी-शहांनी घेतल्याच तर सार्वत्रिक निवडणुका होतील. देश त्याचीच वाट पाहत आहे, असे खासदार संजय राऊत यांनी नमूद केले.
मोदींनी काहीच घडवले नाही
मोदींना इतिहास घडवण्याची संधी नियतीने दिली. मोदींनी काहीच घडवले नाही. एक नवे संसद भवन उभारले, ते सुरू होण्याआधीच पावसात गळू लागले. ‘भारत छोडो’ आंदोलनातून निर्माण झालेल्या स्वातंत्र्याची पहाट संसद भवनात उगवली ते संसद भवन मोदींना नकोसे झाले. तरीही ते ‘भारत छोडो’चे नारे आपल्या विरोधकांविरुद्ध देताना त्याच ऐतिहासिक संसदेने पाहिले, असे सांगून खासदार राऊत म्हणाले, 2024च्या विजयासाठी मोदी-शहांना दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात व भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधून त्यांची वारेमाप स्तुती करावी लागते. हाच त्यांचा पराभव आहे! 2024च्या मोठ्या पराभवाची ही सुरुवात आहे.