घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेत महिला अभियंत्यांचे एक पाऊल पुढे

मुंबई महापालिकेत महिला अभियंत्यांचे एक पाऊल पुढे

Subscribe

मुंबईच्या विकासकामांत ज्याप्रमाणे पुरुष अभियंत्यांचे योगदान आहे, त्याचप्रमाणे पर्यजन्य जलवाहिन्या विभागाच्या १८ महिला अभियंत्यांचेही महत्वपूर्ण योगदान आहे. मुंबई महापालिकेत एकप्रकारे महिला अभियंत्यांचे एक पाऊल पुढे पडले आहे.पावसाळ्यात मुंबईमध्ये समुद्राला असलेली भरती आणि जोरदार पावसाप्रसंगी सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणे, हे मोठे आव्हान असते. हे आव्हान सक्षमपणे पेलण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाची टीम अविरतपणे, विविध पातळीवर काम करते. यंदाच्या पावसाळापूर्व कामांसाठी नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांमध्ये महिला अभियंत्यांचाही तितकाच महत्वाचा वाटा राहिला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला अभियंत्यांची ही टीम आपली जबाबदारी दक्षपणे पार पाडत आहे. मुंबईकर नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, म्हणून ही टीम प्रयत्न करते आहे.

मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागात १८ महिला अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यामध्ये मुंबई शहरात १ दुय्यम अभियंता, पूर्व उपनगरात ९ दुय्यम अभियंता, पश्चिम उपनगरामध्ये ७ दुय्यम अभियंता कार्यरत आहेत. तर पश्चिम उपनगरात १ सहायक अभियंता अशी एकत्रित १८ अभियंत्यांची टीम मुंबईसाठी योगदान देत आहे. मुंबईत, पावसाळ्यामध्ये भरतीच्या काळात अगदी उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) वर सेवा बजावण्यापासून ते नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांसाठी ठिकठिकाणी पोहचून अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य या महिला अभियंत्यांकडून पार पाडले जाते.

- Advertisement -

विशेषतः पावसाळापूर्व कामे मार्च महिन्यापासून सुरू होतात. नाल्यातून गाळ काढण्याची कामे होतात, तेव्हा अतिशय उकाड्याच्या वातावरणापासून ते पावसाळ्यात जोरदार पाऊस असलेल्या स्थितीतही ग्राऊंड झिरोवर पुरूषांइतकीच जबाबदारी महिला अभियंता वर्गाला पार पाडावी लागते. कर्तव्यात पुरूष महिला असा कोणताही भेद होत नाही. पर्जन्य जलवाहिन्या विभागात आम्हालाही अशी सेवा बजावताना मुंबईकरांसाठी एक चांगली सेवा देण्याचा आम्हालाही अभिमान वाटतो, असे या महिला अभियंता सांगतात.

मुंबई महापालिका क्षेत्रासाठी महिला अभियंता महत्वाचे योगदान देत असून भविष्यात मुंबईच्या विकासकामांत योगदान देणाऱ्या महिलांचा टक्का आणखी वाढावा, अशी अपेक्षा मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी व्यक्त केली आहे. आपल्या अविरत कर्तव्यातून मुंबईकरांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणताही अडथळा येऊ नये, यादृष्टीने परिपूर्ण कामगिरी बजावण्याच्या सूचना उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी सर्वांना दिल्या आहेत. मुंबईकर नागरिकांनी देखील नाल्यात कचरा टाकू नये आणि बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजू जहागीरदार यांनी केले आहे.

- Advertisement -

मुंबईकर नागरिकांकडून काय अपेक्षित करता, ह्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना या महिला अभियंता सांगतात की, नाल्यातून गाळ काढण्याचे काम हे ठिकठिकाणी पोहचून करावे लागते. अशावेळी नागरिकांकडूनही आम्हाला प्रतिसाद अपेक्षित असतो. अनेकदा नाल्यातून गाळ किंवा तरंगता कचरा काढण्याचे काम सुरू असतानाही नजरेदेखत नागरिक नाल्यात कचरा टाकतात. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून नाल्यात कचरा टाकू नये, कचरा संकलन व्यवस्थेचा उपयोग करावा, यातून बृहन्मुंबई महापालिकेने केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. अनेकदा गाद्या, सोफा आणि चक्क स्कुटी यासारख्या मोठ्या अडथळा ठरणाऱ्या वस्तुही नाल्यात फेकून दिल्याचे आढळले आहे. अशा वस्तू उदंचन केंद्र, पातमुख किंवा पूरप्रतिबंधक दरवाजे अश्या ठिकाणी अडकून मोठी समस्या उभी राहते आणि त्याचा फटका संपूर्ण परिसराला बसतो. त्यामुळे नागरिकांनी देखील जबाबदारीने वागून मुंबईसाठी मदत करावी, असे नम्र आवाहन या महिला अभियंत्यांनी केले आहे.

हिंदमाता परिसर जलमुक्त राखण्यासाठी यंदा प्रमोद महाजन उद्यान येथे पाणी साठवण टाक्यांच्या प्रकल्पाकरिता पर्जन्य जलवाहिन्या विभागात सहायक अभियंता म्हणून श्रीमती स्नेहल पाटील कार्यरत आहेत. मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात या साठवण टाक्यांमुळे नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास स्नेहल पाटील यांना वाटतो. मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या या प्रकल्पासाठी कर्तव्य बजावताना समाधान वाटते, असेही त्या म्हणाल्या. मुंबईतील नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा न टाकता आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. नागरिकांच्या वागणुकीतील एक छोटासा बदल हा आगामी काळातील समस्या वाढवण्यापासून दिलासा देऊ शकतो, असे टी विभागातील दुय्यम अभियंता रश्मी उभारे यांनी सांगितले. नव्या पिढीच्या महिला अभियंत्यांना महानगरासाठी हे काम किती महत्वपूर्ण आहे, ही बाब समजून या विभागासाठी अधिकाधिक योगदान देण्याचेही आवाहन त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -