वीजेच्या तारा अंगावर पडल्याने दुचाकीचालकाचा होरपळून मृत्यू

vijay kahandol
मृत तरुण विजय

सुरगाणा : पिण्याचे पाणी दुचाकीवरून आणण्यासाठी जाणार्‍या दुचाकीचालकाच्या अंगावर विद्युत पोलच्या तारा पडल्याने त्याचा जागीच होरपळून झाल्याची घटना आज (दि.१२) सकाळी ८ वाजेदरम्यान सुरगाणा तालुक्यातील माणी गावाजवळ घडली. याप्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विजय रमेश कहांडोळे (माणी, ता. सुरगाणा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
विजय रमेश कहांडोळे याचे गावातच चायनीजचे दुकान आहे. तो आज (दि.१२) सकाळी 8 वाजेच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर पिण्याचे पाणी आणण्यासाठी भाऊ योगेश कहांडोळेसमवेत दुचाकीवरून सुरगाणा रस्त्याकडे निघाला. दोघेजण माणी गावच्या कमानीपासून ५०० मीटर अंतरावर आले असता त्याचवेळी विद्युत पोल पडल्याने विद्युत तारा दोघांच्या अंगावर पडल्या. विद्युत तारांमधून वीजप्रवाह सुरू असल्याने वीजेचा जोरदार शॉक विजयला बसला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला योगेश वीजेच्या धक्क्याने फेकला गेल्याने तो जखमी झाला. सुरगाणा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.