कठीण काळातील एक आगळावेगळा अनुभव ‘जॉय ऑफ गिव्हिंग’!

मुंबई : खडतर काळात जो उभा राहतो तो आपला, हा अनुभव अनेकांना येत असतो. कोरोना काळात याचा अनुभव प्रकर्षाने आला. या महामारीच्या काळात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था अडलेल्या-नाडलेल्यांच्या मदतीसाठी धावून आल्या. त्यापैकीच एक म्हणजे ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ ही संस्था.

चीनमधून इतर देशात कोरोनाचा फैलाव झाला. 2020मध्ये त्याने भारतात शिरकाव केल्यानंतर ना भूतो ना भविष्यती अशी परिस्थिती उद्भवली. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाचा कारभार ठप्प झाला होता. लोक भीतीच्या सावटाखाली होती. म्हणूनच आप्त-स्वकीय, शेजारपाजारचे लोकही मदतीला पुढे येत नव्हते. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचे तर हाल सुरू झाले. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीचा चंद्र प्रत्येकालाच हवा होता. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत ‘जॉय ऑफ गिव्हिंग’सारख्या संस्था पुढे सरसावल्या.

लॉकडाऊन काळापासून दोन वर्षांत जवळपास सुमारे पाच ते सहा हजार गोरगरीब, वंचित व गरजू कुटुंबांना किराणा किट देण्याच काम संस्थेतर्फे करण्यात आले व अजूनही हे काम नियमितपणे सुरू आहे. कोणताही स्वार्थ व प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता समाज माध्यमावरील या ग्रुपचे सदस्‍य सढळ हस्‍ते आर्थिक व वस्‍तूरुपी योगदान देऊन संस्थेचा प्रत्येक उपक्रम यशस्‍वी करत असतात.

 

जोगेश्वरीचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त गणेश हिरवे यांनी ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ हा ग्रुप तयार केला. गणेश हिरवे यांनी समाजकार्याचा वसा घेतला आहे. हिरवे यांनी करोना काळात पाच वेळा आणि आतापर्यंत एकूण 35 वेळा रक्तदान केले आहे. या समाजसेवेचे व्रत आणखी व्यापक करण्याच्या दृष्टीने आपले सोबती व समाजातील सधन-गुणी व्यक्तींची साथ घेण्याचे त्यांनी प्रयत्न केले. मुंबईसह महाराष्ट्रभरात या ग्रुपचे सभासद पसरले आहेत. कार्याबहुल्यात अधिक वेळ त्यासाठी देता येत नसल्याने व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ग्रुपचे सर्व सदस्य एकमेकाना जोडले गेले आहेत. सर्वाना सोयीचा दिवस साधून हे सदस्य सातत्याने विविध ग्रामीण व आदिवासी भागात दौरे करतात व तेथील गरजू लोकांना, वृद्धांना, अनाथांना, विद्यार्थ्यांना विविध गरजेच्या वस्तूंची मदत करतात. आजवर या ग्रुपने अनेक लोकोपयोगी उपक्रम विविध भागांत राबवलेले आहेत.

या संस्थेने 2021-22मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला. यावेळी समाजात चांगले काम करणाऱ्या संस्थाना विशेष पुरस्कार आणि महिलांना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘समाजातील सर्व घटकांपर्यंत आनंद व समाधान पोहोचवायचे असेल तर, तरुणाईने पुढाकार घेऊन जागोजागी अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकी जोपासणारे सोशल ग्रुप तयार होणे गरजेचे असल्‍याचे संस्‍थेचे संस्‍थापक हिरवे सर सांगतात. अलीकडेच अनेक गरजू शाळांना साधारण 25 पंखे आणि भांडुप येथील केणी विद्यालयातील वंचित 225 विद्यार्थ्याना किराणा किट व शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य करण्यात आले. संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत.