मुंबईतील रेल्वे रुळांवर कोसळली भिंत, हार्बरची वाहतूक २ तास ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबईत मुसळधार पावसाची बरसात सुरू असताना हार्बर रेल्वे मार्गावरील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास अचानक भिंतीचा भाग कोसळला. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक १५-२० मिनिटे बंद ठेवण्यात आली. मात्र नंतर पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी सदर ठिकाणी असलेल्या भिंतीचा पूर्ण भाग संरक्षित करण्यात आला. त्याकरिता हार्बर मार्गावर वडाळा – सीएसएमटी दरम्यान दुपारी २-४ दोन तासांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला. परिणामी हार्बर मार्गावरील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

मात्र सायंकाळी ४.३० नंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकातून सायंकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.हार्बर मार्गावरील दोन तासांचा मेगा ब्लॉक पाहता बेस्ट उपक्रमाने सदर कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ९ अतिरिक्त बसगाड्यांची व्यवस्था केली होती. या सेवेचा काही प्रवाशांनी लाभ घेतल्याचे समजते.

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळी नेहमीप्रमाणे जनजीवन सुरू असताना हार्बर रेल्वे मार्गावरील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकानजीक एका खासगी इमारतीच्या आवारातील मोडकळीस आलेली भिंत सकाळी ७.१५ वाजता रेल्वे रुळांवर अचानक कोसळली. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र रेल्वे अभियंता, कामगारांनी रेल्वे मार्गावरील भिंतीचा ढिगारा, डेब्रिज तात्काळ बाजूला काढले. तोपर्यन्त हार्बर मार्गावर ट्रेनमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. मात्र त्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुपारी २ – ४ या कालावधीत ज्या भागातून भिंत कोसळली तेथील उर्वरित भिंतीचा भाग संरक्षित करण्यासाठी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक वडाळा ते सीएसएमटी दरम्यान दोन तासांकरिता बंद ठेवण्यात आली.

रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टकडून ९ विशेष बस गाड्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, हार्बर मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या कुर्ला, दादर रेल्वे स्थानक मार्गे प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. तसेच, हार्बर मार्गावरील भिंतींचे संरक्षित करण्याचे काम पूर्ण झाल्यावर या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर दररोज ६७६ लोकल फेऱ्या होत असतात. मात्र सदर भिंत पडण्याची दुर्घटना घडल्याने अनेक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्याचे समजते.


हेही वाचा : शिवसेनेतील गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून निष्ठा यात्रेची घोषणा, महाराष्ट्र पिंजून काढणार