टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात महिलेची प्रसूती

टिटवाळा- टिटवाळा रेल्वे स्थानकात आज सकाळी एका महिलेची लोकलच्या डब्यात प्रसूती झाली. कसाराकडून ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने धावत होती. टिटवाळा रेल्वे सुरक्षा बळ, स्थानक व्यवस्थापक, महिला रेल्वे पोलीस यांच्या प्रयत्नाने महिलेला तात्काळ टिटवाळ्यातील श्री सिध्दीविनायक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी आई, बाळ सुखरुप असल्याचे सांगितले.

कसाराकडून पहाटे एक लोकल सीएसएमटी दिशेने धावत होती. सकाळी ही लोकल नेहमीप्रमाणे धावत होती. या लोकलमध्ये आटगाव रेल्वे स्थानकात प्रीती वाघा वाकचौरे (३३) ही महिला चढली. त्या गर्भवती होत्या. त्या लोकलमधील प्रथम वर्गाच्या डब्यात बसल्या होत्या. अन्य महिला प्रवासी त्यांच्या सोबतीने प्रवास करत होत्या. खडवली रेल्वे स्थानक सोडल्यानंतर प्रिया यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. धावत्या लोकलमध्ये करायचे काय, असा प्रश्न सहप्रवासी महिलांना पडला. तोपर्यंत टिटवाळा रेल्वे स्थानक आले. तोपर्यंत प्रीतीची प्रसूती झाली होती. प्रिया बसलेल्या महिला डब्यातील महिला प्रवाशांनी टिटवाळा स्थानक व्यवस्थापकांना तात्काळ घडला प्रकार सांगितला. लोकल काही वेळ थांबविण्यात आली.

टिटवाळा रेल्वे स्थानकातील गस्तीवरील महिला रेल्वे पोलीस आर. डी. थोरात, पी. के. बांबळे यांनी लोकलच्या डब्यात जाऊन प्रियाला सुस्थितीत केले. तिचे बाळ ताब्यात घेतले. लोहमार्ग पोलीस विशाल देसले, राम पाचपांडे यांनी तातडीने एक रुग्णवाहिका बोलावून प्रीतीला टिटवाळ्यातील सिध्दीविनायक रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी प्रिया आणि बाळाची वैद्यकीय तपासणी केली. दोघेही सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगताच सह महिला प्रवासी, रेल्वे पोलिसांना समाधानाचा सुस्कारा सोडला. ही माहिती प्रियाच्या नातेवाईकांना देण्यात आली, असे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश ढगे यांनी दिली.


हेही वाचा : मुंबईत कलम 144 लागू, कोणत्या गोष्टी सुरू आणि बंद राहणार?