घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास सुरू; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास सुरू; आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Subscribe

महाराष्ट्रात खोके सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी 5 हजार कोटी देण्याची घोषणा केली होती. तसेच, मुंबई खड्डे मुक्त करू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर रस्त्यांसाठी 5 हजार कोटींचे टेंडर काढले गेले.

महाराष्ट्रात खोके सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाइमपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी 5 हजार कोटी देण्याची घोषणा केली होती. तसेच, मुंबई खड्डे मुक्त करू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर रस्त्यांसाठी 5 हजार कोटींचे टेंडर काढले गेले. पण, पाच दहा दिवसांपूर्वीच हे टेंडर रद्द केले आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला. शिवाय, तुमच्या मर्जीतील लोकांनी टेंडर भरले नाही म्हणून टेंडर रद्द केले का? असा सवालही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला. (Aaditya thackeray slams cm eknath shinde over bmc road tenders)

आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला. “मागील अनेक दिवसांपासून आपण पाहिले तर जे सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, गेली 25 वर्षे आणि मागील अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील इतर शहरांप्रमाणे मुंबईवर आमचे जास्त लक्ष होते. मुंबईलाही मोठे प्राधान्य दिले होते. मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने आम्ही अनेक प्रकल्प मुंबईत आणण्याचा प्रयत्न करत होतो”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

“राज्यातील सरकार बदलल्यानंतर मी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी मला अडवण्याचा प्रयत्न केला. सध्या मुंबई महापालिकेत दडपशाही आणि हुकूमशाहीखाली अधिकारी काम करत आहेत. महापालिकेत तीन महत्वाच्या गोष्टी सातत्याने घडत आहेत. टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास या तीन गोष्टी सध्या महापालिकेत सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आणि हे खोके सरकार आल्यानंतर जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वत: घोषणा केली होती की, मुंबईच्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी 5000 कोटी रुपये दिले जातील. 5000 कोटी दिल्यानंतर रातोरात मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. यांसह अनेक घोषणा त्यांनी केल्या होत्या”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली.

“मुख्यमंत्र्यांनी 5000 कोटींचे टेंडर काढले, परंतु, मागील 10 ते 15 दिवसांपूर्वीच हे टेंडर रद्द करण्यात आले. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांचे काय होणार, याबाबत कोणालाच माहिती नाही. मुंबई महापालिकेत आम्ही प्रत्येक वर्षी दोन ते अडीच हजार कोटीचे टेंडर काढत असतो. टप्प्याटप्प्याने ते काम करत असतो. मुख्यमंत्री सांगत असतील की, खड्डे रातोरात खड्डेमुक्त करतो, तर असे कुठेही होत नाही. एकाच वेळी सर्व रस्त्यांचे काम करता येत नाही. त्यामुळे 5000 कोटींचे रस्ते हे बनवणार कसे, कधी आणि किती वेळात रस्ते खड्डेमुक्त करणार यांसारखे अनेक प्रश्न पडले होते.
सरकारला माहीत होतं की नाही माहीत नाही. त्यामुळे सरकार खोटं बोलतंय हे समजत होतं. रस्त्याखाली 42 युटीलिटी असतात. मुंबईत 16 प्लानिंग एजन्सी असतात आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन काम करावं लागतं. हे या सरकारला माहीतच नाही”, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

- Advertisement -

5 हजार कोटींच्या टेंडरमध्ये कोणी आले नाही का? तुमची माणसं आली नाही म्हणून टेंडर दिलं नाही का? असा सवाल करतानाच आता मुंबईच्या रस्त्यांचं काय होणार हे कुणालाच माहीत नाही. पाच हजार कोटींच्या रस्ते कामांच्या घोषणेमुळे गेल्यावर्षीची कामे आणि या वर्षीची कामेही सुरू झाली नाहीत. येत्या पावसाळ्यात मुंबई तुंबली तर त्याला जबाबदार कोण? महापौर आणि स्थायी समिती अस्तित्वात नसताना राज्य सरकारने एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा? असा सवालही त्यांनी केला. 1700 कोटी रुपये मुंबईच्या ब्युटिफिकेशनसाठी जाहीर झाले आहेत. नगरसेवकांचा हा निधी असतो. हा पैसा नगरसेवकांच्या विभागासाठी न वापरता इतर कामांसाठी वळवला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

खोके सरकारमुळे पाच उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. पंचनामे झाले नाही. निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक व्हावी लागते तीही झाली नाही. तरीही खोके सरकार राजकारणावर फोकस आणत आहे, अशी टीका त्यांनी केली.


हेही वाचा – सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचे तुषार गांधींकडून समर्थन, म्हणाले…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -