सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या दोन दिवसीय कोकण दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या दौऱ्यात ते कोणतीही जाहीर सभा न घेता खळा बैठका घेणार आहेत. त्यांच्या या खळा बैठकांना दोडामार्ग नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष लीना कुबल यांच्या घरापासून सुरुवात झाली आहे. त्यांच्या या दौऱ्यामध्ये कोकणातील पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या खळा बैठकींच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना महत्त्व असणार आहे. आज (ता. 23 नोव्हेंबर) झालेल्या पहिल्या खळा बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डिलाईल रोड येथील पुलाच्या उद्घाटनावरून मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतच पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. (Aaditya Thackeray’s criticism on the inauguration of Delai Road bridge)
हेही वाचा – “…तरच राज्यात लोकशाही जिवंत राहणार”, सरकार बरखास्त होण्याबाबत आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
डिलाईल रोडचा उद्घाटन सोहळा आज होणार आहे. या पुलाच्या उद्घाटनावरून गेल्या काही दिवसांत मोठे राजकारण रंगले आहे. 18 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे यांच्यासोबत डिलाईल रोडच्या एका मार्गिकेचे उद्घाटन केले होते. मात्र, या प्रकरणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आज पुन्हा महापालिकेकडून याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला आदित्य ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले आहे. पण त्यांचा हा दौरा नियोजित दौरा असल्याने ते या उद्घाटन सोहळ्याला गैरहजर राहणार आहेत. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मुंबई महापालिकेला मी हेच सांगणार आहे की, 31 तारखेपर्यंत हे सरकार टिकणार आहे. पण जर का माझ्या बाहेर पडण्यासाठीच महापालिका थांबली होती तर त्यांनी आधीच सांगायचे होते. तर मी आधीच कोकणात उद्घाटनाला आलो असतो. कारण उद्घाटन करणे हे महत्त्वाचे आहे.
डिलाईल रोडचे त्यांनी डिले रोड करून ठेवले आहे. आम्ही रस्ता जनहितासाठी खुला केला. पण त्यांनी त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले. ठिक आहे काही हरकत नाही. पण तरी देखील पुढील 10 दिवस तो रस्ता बंद ठेवला. आज एक बिल्डर मंत्री आणि दुसरे पालकमंत्री आहेत, जे मला माहीत नाही काय करत असतात. पण त्यांनी पालिकेत अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यांना आता वेळ मिळाला म्हणून आता उद्घाटन करत आहेत, असा टोला लगावत आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. असेच उद्घाटन आता मुंबई ट्रान्सहार्बरचे झाले पाहिजे. 31 डिसेंबर पर्यंत या कामाच्या उद्घाटनासाठी थांबू नये, असा सल्लाही आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे.
हे सर्व काही ट्वीटमुळे…
आदित्य ठाकरे हे त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर कायमच निशाणा साधत असतात. त्यांच्या ट्वीटचा परिणाम हा सत्ताधाऱ्यांवर होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत. त्यामुळे याबाबत बोलताना आदित्य म्हणाले की, माझ्या ट्वीटनंतर यांचे तीन परदेशाचे दौरे रद्द झाले आहेत. ट्वीटनंतर नवी मुंबई मेट्रोचे पाच महिन्यानंतर उद्घाटन झाले. ट्वीटनंतर बीएमसी आणि बीएसटीच्या कामगारांना बोनस दिले गेले. ट्वीटनंतर डिलाईल रोडचे उद्घाटन होत आहे. परंतु, आजही अनेक उद्घाटन थांबले आहेत. दिघा रेल्वे स्टेशन, उरण रेल्वे या सर्वांचे उद्घाटन झाले पाहिजे. इतर राज्यात प्रचार करता येतो. आमच्या राज्यात घाणेरडे आणि फोडाफोडीचे राजकारण करता पण जनहिताचे काम कधी करणार? असा प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.