घरमहाराष्ट्रआरे कारशेडला ८२ हजार जणांचा विरोध

आरे कारशेडला ८२ हजार जणांचा विरोध

Subscribe

एमएमआरसीचा सुनावणीतून काढता पाय

फणस, चिकु, जांभुळ, बाभूळ ही सगळी आम्हाला वर्षापोटी उत्पन्न देणारी झाडे. लहान मुलासारखी ही झाड आम्ही सांभाळली. या झाडांमुळे आमचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत होता, पण मेट्रोच्या कारशेडसाठी ही झाड कोणाला विचारून तोडली असा सवाल आशाताई यांनी केला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या आरे कारशेडसाठी आयोजित जनसुनावणीसाठी आरे कॉलनीत राहणार्‍या आशाताईंंनी पोटतिडकीने हे प्रश्न विचारले. आम्हाला गरजच नसताना मेट्रो आमच्यावर का लादत आहात असाही सवाल त्यांनी केला. आरे कारशेडसाठी वृक्ष छटाईसाठी झालेल्या सुनावणीला ८२ हजार मुंबईकरांनी हरकती आणि सूचना पाठवल्या आहेत. आज झालेल्या दुसर्‍या जनसुनावणीत आरे वाचवा मोहिमेसाठी काम करणार्‍या विविध संघटनांनी आरेच्या जागेतील मेट्रोच्या कारशेडला जोरदार विरोध केला.

आरेतील मेट्रो कारशेडसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होणार आहे. त्यासाठी आरेमधीलच पाण्याचा वापर बोअरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे आरेमधील पाण्याचा समतोल कसा साधणार असा सवालही यावेळी करण्यात आला. प्रकल्पाच्या कामात स्थानकाच्या ठिकाणी झाडांची झालेली कत्तल ही समजून घेण्यासारखी आहे. पण कारशेडसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी झाडाची कत्तल ही न समजण्यासारखी आहे असेही मत यावेळी मांडण्यात आले. एमएमआरसीकडून आरे कारशेडच्या नावावर अनेक झाडे तोडली, कापली गेली आहेत. काही ठिकाणी झाडे जाळण्याचा प्रकारही झाला आहे अशीै माहिती आशिष पाटील यांनी सुनावणीदरम्यान दिली. झाडे जाळणार्‍यांविरोधात एफआयआर दाखल करा अशीही मागणी त्यांनी केली. कारशेडसाठी होणार्‍या वृक्षतोडीच्या बदल्यात लावलेल्या मोठ्या झाडांचे वृक्ष हे अवघ्या ५ फुटांवर लावण्यात आले अस सांगत त्यांनी एमएमआरसीच्या कामावर टीका केली.

- Advertisement -

वृक्ष प्राधिकरणालाच ट्री कटिंग ऑथोरिटी असे नाव द्या अशी मागणी सेंट झेव्हीयर्सचे प्राध्यापक अवकाश जाधव यांनी केली. महापालिका कुणाची आहे ? जनसामान्यांची की भांडवलदारांची असाही सवाल त्यांनी केला. ही ब्रिटीशांपेक्षाही क्रुर वागणूक असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. याआधी झालेल्या जनसुनावणीचे मिनिट्सही जाहीर झाले नाहीत. आजच्या जनसुनावणीचे मिनिट्स कधी जाहीर होणार असाही सवाल यावेळी करण्यात आला.

एमएमआरसीच्या अधिकार्‍यांची एक्झिट
जर ही जनसुनावणी वृक्ष प्राधिकरणाकडून घेतली जात आहे तर एमएमआरसीचे अधिकारी व्यासपीठावर का आहेत असा सवाल आपच्या कार्यकर्त्यांकडून सुनावणी दरम्यान करण्यात आला. एमएमआरसीचे अधिकारी हे तांत्रिक मुद्द्यांच्या नोंदी घेण्यासाठी आहेत अशी भूमिका यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी घेतली. पण वाढता जनक्षोब पाहता एमएमआरसीच्या अधिकार्‍यांनी सुनावणीतून काढता पाय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -