Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अभिजीत पाटील राष्ट्रवादीत; भाजपशी जवळीक असूनही पवारांच्या गळाला

अभिजीत पाटील राष्ट्रवादीत; भाजपशी जवळीक असूनही पवारांच्या गळाला

Subscribe

 

सोलापूरः भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा दोन्ही पक्षासोबत जवळीक असलेले साखर सम्राट अभिजीत पाटील यांनी रविवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील हे महाराष्ट्रातील पाच साखर कारखाने चालवत आहेत. त्यामुळे पाटील नेमके कोणत्या पक्षात जातील याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पाटील हे राष्ट्रवादीत गेल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपला मोठे आव्हान तयार झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ते प्रसिद्ध आहेत. या मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे आमदार आहेत. २०२४ च्या निवडणुकीत पाटील हे अवताडे यांना चांगली टक्कर देऊ शकतात. भाजपच्या गोट्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राजीनामा नाट्य संपल्यानंतर शरद पवार रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. विठ्ठल साखर कारखान्याच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. याच कार्यक्रमात पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी भाषणात शरद पवार यांनी पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पाटीलचं असतील. तुम्ही तयारीला लागा, असे आदेशच शरद पवार यांनी दिले. त्यामुळे भाजप चिंतेत गेली आहे.

- Advertisement -

राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार यांचा पक्षात दरारा किती आहे हे पुन्हा स्पष्ट झाले. राजीनामा नाट्य सुरु असतानाही शरद पवार यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. सांगलीतील जत तालुक्यातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी मणिपूर येथे राहत आहेत. जत तालुक्यातील आवंडी गावामधील संभाजी कोडग यांचा मुलगा मयूर मणिपूर येथे शिक्षण घेत आहे. मणिपूर येथे हिंसाचार सुरु झाल्यानंतर त्याने तेथून वडिलांना फोन केला. आजुबाजुला गोळीबार सुरु आहे. बॉम्बस्फोट होत आहेत. आम्हाला वाचवा. कादाचित हा माझा शेवटचा फोन असेल, असे मयूरने वडिलांना सांगितले. यामुळे ते अस्वस्थ झाले. त्यांनी बारामतीचे प्रल्हाद वरे यांच्याशी संपर्क साधला. आयआयटीचे शिक्षण घेणारी महाराष्ट्रातील काही मुले मणिपूर येथील हॉस्टेलमध्ये अडकली आहेत. त्यांना वाचवा, अशी विनंती संभाजी यांनी प्रल्हाद वरे यांना केली. ५ मेरोजी शरद पवार यांंना भेटायला जाऊ, असे वरे यांनी संभाजी यांना सांगितले. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत होती. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने निरोप पोहोचवण्याची विनंती संभाजी यांनी वरे यांना केली. शरद पवार यांच्या पर्यंत हा निरोप गेल्यानंतर त्यांनी तत्काळ मणिपूरच्या राज्यपाल यांना फोन करुन विद्यार्थ्यांना सुरक्षित जागी हलवण्यास सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षित जागी हलवण्यात आले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -