घरमहाराष्ट्रफरार डॉ. बॉम्बला कानपूरमधून अटक

फरार डॉ. बॉम्बला कानपूरमधून अटक

Subscribe

अजमेर बॉम्बस्फोटातील फरार गुन्हेगार मोहम्मद जलीस उर्फ डॉ. बॉम्ब याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथून अटक करण्यात आली आहे. तो देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. पॅरोलवर असणारा अन्सारी गुरुवारी मुंबईतून फरार झाला होता. महाराष्ट्र एटीएस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्याला कानपूर येथे अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी दिली. कानपूर येथे अटक केल्यानंतर त्याला लखनऊ येथे आणण्यात येणार असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

मार्च 1993 साली मुंबई शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मोहम्मद जलीस याचा सहभाग उघडकीस येताच त्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी टाडाखाली अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्याला विशेष टाडा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा होताच त्याला राजस्थान येथील अजमेर कैद्रीय कारागृहात पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो तिथेच शिक्षा भोगत आहे. 28 डिसेंबर 2019 रोजी त्याच्यावतीने सुप्रीम कोर्टात अर्ज करण्यात आला होता. त्यात त्याने 21 दिवसांच्या संचित रजेची मागणी केली होती. या अर्जावर सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने त्याला 21 दिवसांची संचित रजा मंजूर करताना स्थानिक पोलीस ठाण्यात सकाळी साडेदहा ते बारा या कालावधीत हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

ही रजा मंजूर होताच जलीस अजमेर कारागृहातून त्याच्या आग्रीपाडा येथील मोमीनपुरा, बीआयटी चाळ क्रमांक एक, खोली क्रमांक 36 मध्ये आला होता. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तो नियमित आग्रीपाडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी जात होता. बुधवारपर्यत तो हजेरीसाठी गेला होता. यावेळी त्याला आग्रीपाडा पोलिसांनी शुक्रवारी 17 जानेवारीला आर्थर रोड कारागृहात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

गुरुवारी सकाळी पाच वाजता मोहम्मद जलीस हा नमाजासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र बराच वेळ होऊनही परत आला नाही. त्याच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर त्याच्या मुलाने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे त्याचे वडिल मोहम्मद जलीस शफीउल्ला अन्सारी हे मिसिंग झाल्याची तक्रार केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -