घरताज्या घडामोडीParambir singh : चांदीवाल आयोगाच्या इशारा, अन् परमबीर सिंहांची शरणागती

Parambir singh : चांदीवाल आयोगाच्या इशारा, अन् परमबीर सिंहांची शरणागती

Subscribe

फरार म्हणून म्हणून घोषित मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह तब्बल २३१ दिवसांनी मुंबईत गुरूवारी दाखल झाले. चांदीवाल चौकशी आयोगाने दिलेल्या इशाऱ्यानंतर येत्या सोमवारी आयोगासमोर हजर राहणार आहेत. परमबीर सिंह यांच्या वकिलांनीच ही माहिती आयोगाला दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी चौकशी आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. सध्या बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची उलटतपासणी सुरू आहे. आज शुक्रवारी परमबीर सिंह यांची ठाण्यात खंडणी प्रकरणात चौकशी सुरू आहे. तर याआधी गुरूवारी मुंबई क्राईम ब्रॅंचने खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांची सहा तास चौकशी केली आहे.

वारंवार समन्स बजावूनही हजर न झाल्याने चांदिवाल आयोगाने यापूर्वी परमबीरविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. परमबीर हे आता मुंबईत आले असल्याने त्यांना आयोगासमोर हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील, असा इशारा न्या. चांदिवाल यांनी गुरूवारी दिला होता. पण परमबीर सिंह हे स्वतःच सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

सेवानिवृत्त न्यायमूर्ति के.यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेतील आयोगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांच्याककडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चौकशी करत आहे. याआधी मार्च महिन्यात महाराष्ट्र सरकारने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची नेमणूक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रीमंडळातून राजीनामा दिला होता. तर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून या पत्राच्या माध्यमातून गृहमंत्र्यांवर आरोप केले होते. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर एपीआय सचिन वाझे यांच्या माध्यमातून खंडणी वसुली केल्याचा आरोप केला होता.

याआधी याच आठवड्यात मंगळवारी सचिन वाझेंना आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले होते. या आयोगाच्या कामकाजादरम्यान कार्यवाही सुरू करताना सचिन वाझेने आयोगासमोर एक याचिका दाखल केली. जोवर परमबीर सिंह हे चौकशीला हजर होत नाहीत आणि प्रतिज्ञापत्र देत नाहीत, तोवर साक्ष नोंदवणे टाळावे अशी मागणी वाझेंनी केली होती. पण चांदिवाल आयोगाने ही याचिका फेटाळली. या चौकशी दरम्यान परमबीर सिंह यांचे वकील यांनी आयोगाला सांगितले की, या प्रकरणात आणखी कोणतेही पुरावे देणे शक्य नाही. सिंह यांचे वकिल चंद्रचूड यांनी एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली होती.

- Advertisement -

परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात पाच खडणीच्या प्रकरणांची तक्रार आहे. या खंडणी वसुलीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासोबतच सहाजण आरोपी आहेत. त्यामध्ये सचिन वाझेंच्या नावाचाही समावेश आहे. सचिन वाझेंना या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे. तसेच सध्या वाझे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर मुंबईच्या किला कोर्टाने परमबीर सिंह यांना खंडणी प्रकरणात फरार घोषित केले आहे. किला कोर्टातही परमबीर सिंह येत्या सोमवारी अर्ज करणार आहेत.


परमबीर सिंह ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल; आणखी एका खंडणीच्या आरोपप्रकरणी होणार चौकशी

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -