नाशिक : अधिकमासाला सुरुवात झाल्याने जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. वाण देताना चांदीची ताटे, वाट्या, पेले, नाशिक घाटाची गडवी इत्यादी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे नाशिकच्या सराफ बाजारात चांदीला मोट्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
दर ३३ महिन्यांनी अधिकमास येत असतो. या अधिकमासात विविध प्रकारचे दानधर्म व उपवास केले जातात. या मासात विष्णुरूप ज्या गोष्टी आहेत, त्यांना वाण देण्याची प्रथा आहे. त्यात काही जण रामाला वाण देतात, काही जण कृष्णाला वाण देतात. जावई हा हिंदू धर्मात विष्णुरूप मानला गेल्याने त्यालाही वाण देण्याची पद्धत आहे. या वाणात बत्ताशे, चांदीचे किंवा तांब्याचे दिवे, चांदीची ताटे, चांदीच्या विविध वस्तू देण्याची प्रथा आहे. यामुळे सराफ बाजारातील सुवर्णकारांकडे चांदीच्या भांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. चांदीचा सध्याचा भाव ७९ हजार रूपये किलोपर्यंत आहे. बाजारात महाराष्ट्रातून खास नाशिक घाटाची चांदीची भांडी घेण्यासाठी लोक येत असतात. त्यामुळे सध्यातरी नाशिकची बाजारपेठ ग्राहकांनी फुलली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता सुवर्णकारांनी खरेदीच्या विविध योजना जाहीर केल्या आहेत.
नाशिकच्या चांदीला मागणी का
नाशिकच्या चांदीचे वैशिष्ट्य यासाठी आहे, की येथे चांदीची भांडी घडविताना या धातूची शुद्धता शंभर टक्के कायम ठेवली जाते. त्याचबरोबर नाशिक घाटाची भांड्यांची व उपकरणांची घडणावळ, त्यावरील नक्षीकाम हे जगभरात प्रसिद्ध आहे. शुद्ध चांदीची भांडी आणि मूर्ती हे नाशिकच्या कारागिरांचे वैशिष्ट्य आहे. या भांड्यांना आणि मूर्तींना देशभरातून मोठी मागणी असल्याने चांदीची सुमारे पाचशे कोटी रुपयांची उलाढाल नाशिकमध्ये होते.
या वस्तूंना मागणी
चांदीचे दिवे, ताट, वाट्या, ताह्मण, पूजेचा सेट, तांब्या-भांडे, जोडवी, पैंजण, समई , चांदीचे ट्रे, फुलदाणी, अत्तरदाणी, सुपारीचे भांडे, चांदीचे गाय-वासरू आदी वस्तूंना मागणी आहे.