पश्चिम रेल्वेच्या एसी सेवेची ऐशीतैशी, दुप्पट पैसे मोजूनही सर्वसाधारण गाडीतून प्रवास

AC LOCAL

मुंबई : एकीकडे मुंबईतील एसी लोकल सेवेला विरोध होत असतानाच दुसरीकडे याच्या तिकिटाचे दर निम्म्याने कमी केल्याने याच्या प्रवासीसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण याबाबत रेल्वे प्रशासनाचे धोरण मात्र बेफिकिरीचे असल्याचे दिसत आहे. विशेषत:, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना एसी लोकलसाठी दुप्पट पैसे मोजूनही सर्वसाधारण गाडीतूनच प्रवास करावा लागतो.

मुंबईत पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबर 2017ला चालवण्यात आली होती. बोरीवली ते चर्चगेट अशी ही पहिली एसी लोकल धावली. तर, मध्य रेल्वेवर पनवेल ते ठाणे दरम्यान 30 जानेवारी 2018पासून एसी लोकल सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने याच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. तर, यावर्षी एप्रिल महिन्यात एसी लोकलच्या तिकीट दरात निम्म्याने कपात करण्यात आली. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे प्रवासी संख्याही वाढली. एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंतच्या कालावधित ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथून एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या सात पटीने वाढली. सर्वाधिक 10 लाख 50 हजार 511 प्रवासीसंख्या ही ठाणे स्थानकात असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली.

तर दुसरीकडे, एसी लोकलला राष्ट्रवादी काँग्रेसने ऑगस्ट महिन्यात कडाडून विरोध केला आहे. एसी गाड्यांमुळे नोकरदार वर्ग, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी यांच्यावर जास्त परिणाम होतो. एक गाडी रद्द करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सामान्यांच्या वेदनेत वाढ होत आहे. एसी लोकल बंद केल्या पाहिजेत आणि सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन उपलब्ध केले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले होते. बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर मध्य रेल्वेने एसी लोकलच्या 10 फेऱ्या रद्द केल्या होत्या.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी ऑगस्टमध्ये पश्चिम रेल्वेच्या अपर महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी आणि सचिव सचिन वर्मा या दोघांची भेट घेतली होती. पश्चिम रेल्वेवरील एसी ट्रेन बंद करून त्या जागी आधी असलेल्या लोकलच चालवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती.

मात्र तरीही पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या नाहीत. उलट, तेथील एसी लोकल प्रवाशांची संख्या वाढतच आहे. त्याच्याबरोबरीने पश्चिम रेल्वेची बेफिकिरीपणा देखील पाहायला मिळत आहे. विरार स्थानकावरून सकाळी 5.50 वाजता सुटणारी एसी ट्रेन नियमितपणे उशिराने सुटते. त्यातच ही गाडी दर सोमवारी रद्द केली जाते आणि त्याऐवजी नियमित गाडी सोडली जाते. याशिवाय, इतरवेळी देखील ऐनवेळी गाडी रद्द करून नियमित गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे मासिक पासासाठी दुप्पट पैसे मोजल्यावरही सर्वसाधारण लोकलमधून प्रवास करावा लागतो, अशी प्रवाशांची तक्रार आहे.

त्यातच तिकीट तपासनीसांकडून गाडीमध्ये तपासणी होत नसल्याने अन्य नागरिकही एसी लोकलमधून प्रवास करतात. परिणामी एसीच्या नियमित प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागतो. त्याबाबतही प्रशासनाने पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रवासी सांगतात.