‘थेट जनतेतून नगराध्यक्ष’ निवडीच्या हालचालींना वेग

नाशिक : राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचा धडाका लावलेला असताना त्यात थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिले आहे. याविषयी सर्वप्रथम मागणी चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी नवीन सरकारकडे केली होती.

भाजप-शिवसेना युतीच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून आले होते. मात्र, 2019 मध्ये युतीची सत्ता गेली आणि महाविकास आघाडीच्या रुपाने उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी युतीचा हा निर्णय रद्द करत पुर्वीची पध्दत अवलंबली. आता भाजप-सेना युतीची पुन्हा सत्ता आल्यामुळे हा निर्णय बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे त्यांना हा निर्णय लागू राहणार नाही.

नाशिकमधून पहिली मागणी

राज्यात थेट नगराध्यक्षपद निवडण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या असताना याविषयी पहिली मागणी चांदवड येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी 2 जुलै 2022 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत ही मागणी केली होती. त्यानंतर याविषयी राज्य स्तरावर हालचाली सुरु झाल्या. पण ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला. यात नाशिक जिल्ह्यातील चांदवडसह सात नगरपालिकांचा समावेश आहे.