अपघाती निधन झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला १ कोटी; पोलीस आयुक्तांच्या हस्ते धनादेश

ठाणे: मोटार अपघातामध्ये निधन पावलेले पोलीस शिपाई घनश्याम ब्रम्हदेव गायकवाड यांच्या कुटुंबाला विम्याचे १ कोटी रुपयांचा धनादेश एचडीएफसी बँकेने दिले. हा धनादेश घनश्याम यांच्या मातोश्री मंगल गायकवाड यांनी गुरुवारी ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंह यांच्या हातून स्वीकारला. याप्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त डॉ महेश पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे शहर पोलीस दलामध्ये नौपाडा पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस शिपाई घनश्याम ब्रम्हदेव गायकवाड हे १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्र पाळीच्या डयुटीवर कर्तव्य बजावताना पहाटे चार वाजून २१ मिनिटांच्या सुमारास नितीन कंपनी ब्रिजजवळ त्यांचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होवून त्यांचे निधन झाले.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने त्यांचे अधिपत्याखालील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पगार खाते एचडीएफसी बँकेत ठेवण्याबाबत करार केलेला आहे. या करारांतर्गत पोलीस दलातील कोणत्याही कर्मचाऱ्याचे अपघातात निधन झाल्यास रुपये १ कोटी विमा बँकेने देवू केले आहे. तर ,पोलीस शिपाई घनश्याम गायकवाड यांचे अपघातात निधन झाल्याने अपघात विमा दावा बँकेत सादर केला असता, बँकेने तातडीने दावा मंजुर करून अपघात विमा रक्कम एक कोटींचा धनादेश दिवंगत घनश्याम गायकवाड यांची आई मंगल गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.