मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये अनेक महिलांना, पुरुषांना तर बऱ्याच अपघातांमध्ये चिमुकल्यांचाही समावेश असतो. परंतु आता राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मागील साडेतीन वर्षांमध्ये झालेल्या एकूण अपघातात पुरुषांनी की महिलांनी सर्वाधिक जीव गमावला याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत गेल्या साडेतीन वर्षांमध्ये झालेल्या अपघातात आतापर्यंत सर्वाधिक महिलांनी आपले जीव गमावले आहेत. (Accident News Who died the most in road accidents? Women’s or men’s?)
राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या साडेतीन वर्षांमध्ये म्हणजेच 01 जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यात एकूण 14 हजार 170 अपघात झाले. त्यात 11 हजार 898 नागरिक जखमी तर 07 हजार 229 जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंमध्ये 06 हजार 326 महिलांचा समावेश आहे. कार्यकर्ते अभय कोलाकर यांच्या माहितीच्या अधिकारातून यांनी हा तपशील पुढे आणला आहे. महिलांच्या एकूण मृत्यूमध्ये 2021 मध्ये 01 हजार 368, 2022 मध्ये 01 हजार 632, 2023 मध्ये 01 हजार 867 तर जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 01 हजार 459 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा… Shekharkumar Yadav : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायमूर्तींविरोधात राज्यसभेत महाभियोगाची नोटीस
तसेच, रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर झाले असल्याची माहिती सुद्धा या माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्गांवर 2021 मध्ये 07 हजार 501 अपघातात 04 हजार 80 मृत्यू झाले. राज्य महामार्गावर 06 हजार 328 अपघातात 03 हजार 411 लोकांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्गावर 09 हजार 417 अपघातात 04 हजार 923 लोकांचा मृत्यू झाला. तर राज्य महामार्गावर 04 हजार 822 अपघातात 02 हजार 548 मृत्यू झाले. 2023 मध्ये राष्ट्रीय महामार्गावर 10 हजार 881 अपघातात 05 हजार 780 मृत्यू झाले.
तर, राज्य महामार्गावर 04 हजार 822 अपघातात 02 हजार 548 मृत्यू झाले. जानेवारी 24 ते ऑक्टोबर 24 दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर 09 हजार 348 अपघातात 04 हजार 681 मृत्यू झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर 04 हजार 822 अपघातात 02 हजार 548 मृत्यू झाले. त्यामुळे राज्यात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर अपघात व मृत्यू जास्त असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. तसेच, राज्यात 2021 ते 2023 दरम्यान रस्ते अपघात दगावणाऱ्यांमध्ये 18 वर्षांखालील 01 हजार 229 जणांचा समावेश आहे. 2021 मध्ये 373 मृत्यू, 2022 मध्ये 454 मृत्यू, 2023 मध्ये 402 मृत्यूंचा समावेश आहे.