मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; मुख्यमंत्री सुरक्षित

eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देण्यासाठी सायंकाळच्या सुमारास येत असताना त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाला महापालिका मुख्यालयानजीक अपघात झाला. त्यामुळे याअपघातामध्ये दोन वाहनांचे नुकसान झाले. मात्र या वाहन अपघातामध्ये मुख्यमंत्री सुरक्षित असून कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते.

मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईतील पाऊसपाणी व पालिकेची तयारी याबाबत आढावा घेण्यासाठी मंगळवारी धावती भेट दिली.

मात्र पालिकेत येताना त्यांचे वाहन पालिका मुख्यालयाजवळ थांबले असताना त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांच्या एका वाहनाला मागून आलेल्या शासकीय वाहनाची जोरदार धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले. ज्या वाहनाचे अधिक नुकसान झाले ते नंतर तेथून हलवून दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये पाठविण्यात आल्याचे समजते.


हेही वाचा : पीएम मोदी, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत समृद्धी महामार्गाचे लोकार्पण – देवेंद्र फडणवीस