एसटी बसला अपघात; प्रवासी सुखरूप

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून ४० प्रवाशांना घेऊन जाणारी एसटीची निमआराम बस दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगत पावसाळी गटारात कलंडल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता येथून जवळ चौक फाटा येथे घडली. सुदैवाने या घटनेत प्रवासी सुखरूप आहेत.

पुण्याहून मुंबईकडे जाणारी ही बस (एमएच 23 बीएल 3323) चौक गावानजीक आली असता दुचाकीस्वार चुकीच्या मार्गिकेतून विरूद्ध बाजूने आल्यानंतर चालकाने धडक टाळण्यासाठी बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बसचे चाक बाजूला रस्त्यालगत पावसाळी गटारात गेल्यामुळे एका बाजूला कलंडली. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. त्यांना उतरण्याच्या बाजूकडील दरवाजा बस कलंडल्याने बंद झाल्यामुळे वाहक आणि चालक, तसेच स्थानिक तरुण अभिजित घरत व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत चालक बाजूकडील संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा उघडत सर्वांना बाहेर पडण्यास मदत केली. कलंडलेली बस लोखंडी दोर लावून कंटेनरच्या मदतीने तत्काळ बाहेर काढण्यात आली. बस सुस्थितीत असल्याने प्रवाशांना घेऊन मुंबईकडे रवाना झाली.