नेतृत्वाने सांगितलं तर घरी बसायलाही तयार, फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. उपमुख्यमंत्री झालेला पहिला मुख्यमंत्री पाहिला अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही खिल्ली उडवली होती. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नेतृत्वाने सांगितलं तर मी घरी बसायलाही तयार आहे, असं फडणवीस म्हणाले. नागपुरात आज त्यांची स्वागतयात्रा काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. (According to the leadership, Fadnavis is ready to stay at home)

हेही वाचा – ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस नागपुरात दाखल

नरेंद्र मोदी आणि अमित शहा  होते म्हणून मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनता आलं. मोदीजी आणि अमित शहा नसते तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. ज्यांनी मला मोठं केलं त्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्त्वाने मला उपमुख्यमंत्री बनायचा आदेश दिला म्हणून मी उपमुख्यमंत्री बनलो. त्यांनी सांगितलं तर मी घरी बसायलाही तयार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नेतृत्त्वाने सांगितलं की, तू १०६ आमदारांचं नेतृत्त्व करतो आहेस. त्यामुळे तुला जबाबदारी स्विकारावी लागेल. म्हणून मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली, असंही फडणवीस पुढे म्हणाले.

हेही वाचा – ‘ईडी’चे सरकार, पण ‘एडी’च्या तीन वर्षांत तीन भूमिका; सर्वच अचंबित

मी सरकारमध्ये जाणारच नव्हतो, पण मला हाय कमांडने सांगितले. शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा असतो, म्हणूनच मी उपमुख्यमंत्री बनलो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा आदित्य ठाकरेंच्या जवळच्या अधिकाऱ्याची बदली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दणका

ते पुढे म्हणाले की, सर्व म्हणताहेत की हे सरकार सहा महिने चालेल. २०१४ साली युतीचं सरकार आलं तेव्हाही असंच सगळे म्हणाले होते. पण ४० वर्षांनंतर पहिल्यांदा ५ वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता. भाजपचं सरकार होतं. पुढची अडीच वर्ष तर पूर्ण करूच पण, पुढच्या पाच वर्षांत बहुमताचं सरकार महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.


नागपूरकरांचे आभार

आज मला अतिशय आनंद होत आहे. १ महिना ५ दिवस मी नागपूरपासून दूर होतो. सातत्याने एक लढाई चालली होती. त्यामुळे नागपूरमध्ये येता येत नव्हतं. नागपूर आपली जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. पुण्यभूमी आहे, विचारभूमी आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कधी यायला मिळतंय असं वाटत होतं. कधी तुमच्याशी भेटतोय असं वाटत होतं. आणि आज नागपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही जो सर्वांनी भव्य सत्कार केला, मी खरं म्हणजे तुमचे आभार कसे मानू हेच मला समजत नाही. पण आपल्यांचे आभार मानायचे नसतात, आपल्यांच्या ऋणातच राहायचं असतं. त्यामुळे नेहमीच तुमचं माझ्यावर ऋण राहणार आहे. मी तुमचा कर्जदार आहे. आणि तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा करत करत मी तुमच्या प्रेमाचं कर्ज फिटवण्याचं काम मी करणार आहे. आता पुढची अडीच वर्षे कर्मण्यतेची वर्षे आहेत. या महाराष्ट्राला, या विदर्भाला महाराष्ट्रातील एक-एका नागरिकाला, त्याच्या आशा-आकांक्षा पूर्ण करायची, महाराष्ट्रासमोरचे प्रश्न सोडवणार, महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनामध्ये जे जे काही दडलेलं आहे, ती प्रत्येक गोष्ट वास्तविकमध्ये उतरवत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून २४ तास काम करून, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशाचं सर्वोच्च राज्य बनवल्याशिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसची जोडी श्वास घेणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो,