येत्या ४८ तासांत केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन; हवामान विभागाचा अंदाज

गेल्या अनेक दिवसांपासून लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान यंदा मान्सून लवकर बरसेल अशी शक्याता सांगितली जात होती. मात्र मान्सूनच्या अंदाजाची तारीख चुकलेली आहे. २७ तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र अजून केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले नसून येत्या ४८ ते ७२ तासात मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकते. त्यानंतर ८ ते १० दिवसाच्या कालावधीत मान्सून महाराष्ट्र आणि गोवा, पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल.

हवामान तज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाल्याने, पुढील २-३ दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे वाढतोय उकाडा
सध्या मुंबईसह राज्यातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरणाची नोंद केली गेली आहे. असा ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण आता मान्सूनची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ५ जूनला मान्सून बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र केरळमध्ये अजूनही मान्सूनचे कोणतेही अपटेड समोर आले नसल्याने महाराष्ट्रातला मान्सूनचा अंदाज चुकू शकतो.

राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन
हवामान स्थितीचा अंदाज घेत कृषी मंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये असे आवाहन केले आहे.

या राज्यांना मान्सून अलर्ट
पुढील २४ तासांमध्ये पूर्वोत्तर भारत, तमिलनाडु, केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता सांगितली जात आहे.