मुंबईतील शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला राजस्थानमधून अटक

Accused arrested from rajasthan for trapping Shiv Sena MLA in sextortion case
शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला राजस्थानमधून अटक

शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. गेल्या काही काळात सेक्सटॉर्शन किंवा हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून आमदारालाच यात अडकवण्यात आलं.

हल्ली सेक्सटॉर्शनच्या नावाखाली डॉक्टर, वकील यासारख्या व्यक्तींना अडकवलं जात होतं. या आरोपींनी आता राजकारण्यांकडे मोर्चा वळवला आहे. या आरोपीने पूर्व उपनगरातील एका आमदाराला यात अडकवण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तक्रारदार आमदार यांना २० ऑक्टोबरच्या रात्री एक संदेश पाठवला होता. हा संदेश आरोपीने एक महिला बनून पाठवला होता. त्यानंतर तक्रारदार आमदार यांनी प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. चॅटद्वारे या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. त्यानुसार आमदारांनी महिला समजून मदत करण्याचं आश्वासन दिलं.

काही वेळानं आमदारांना एका महिलेने व्हिडिओ कॉल केला. महिलेनं सुमारे १५ सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली. फोन कट होताच आमदारांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ पाठवला. आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

या प्रकरणी आमदाराने मुंबई पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर आरोपीचा भरतपूर येथे शोध लागला. भरतपूर येथील सिकारी पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून पकडलं. लवकरच या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.