Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गोंदिया: पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, चार पोलिसांना निलंबित

गोंदिया: पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, चार पोलिसांना निलंबित

Related Story

- Advertisement -

गोंदिया जिल्हातील आमगावमध्ये आज चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या ३० वर्षी आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण या घटनेनंतर पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी आमगाव पोलीस ठाण्यातील या प्रकरणातील संबंधित चार पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

नक्की काय घडले?

आमगावच्या जिल्हा परिषद शाळेतील चोरीच्या प्रकरणी २० मे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. राजकुमार अभय कुमार (३०), सुरेश धनराज राऊत (३१), राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) आणि एक अल्पवयीन मुलाला अटक केली. चौघांना कोर्टात हजर केले असता अल्पवयीन आरोपीला सोडून देण्यात आले आणि उर्वरित तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आज याप्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार अभय कुमारचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

- Advertisement -

कुमार अस्वस्थ असल्याची पोलिसांना तक्रार दिली होती. त्यानंतर आज शनिवारी त्याला अचानक घाम येऊ लागला आणि त्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तेथील डॉक्टरांनी आरोपीला मृत घोषित केले. ठाणेदार सुभाष चव्हाण यांनी त्याला खूप घाम आला होता आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला होता.

परंतु आरोपीच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबियांनी मृत्यूला जबाबदार पोलीस असल्याचे सांगितले. संतप्त स्थानिक लोकांनी आमगाव पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केले. ज्यानंतर वरिष्ठ अधिकारी माहिती घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे घटनेचे गंभीर स्वरुप लक्षात घेऊन एसपी पानसरे यांनी ठाणेदार सुभाष चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, चालक खेमराज खोब्रागडे आणि कॉन्स्टेबर अरुण उइके यांना निलंबित करण्यात आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -