घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्कार केल्याचा आरोप

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्कार केल्याचा आरोप

Subscribe

परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. ज्यांच्याविरोधात हा आरोप करण्यात आला त्या राजेश विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. विशेष म्हणजे विटेकरांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांचे नाव घेऊन पीडितेला धमकावल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

राजेश विटेकर हे पीडित महिलेवर वर्षभरापासून अत्याचार करत होते. त्यांनी पीडितेचे अश्लील व्हिडिओ देखील तयार केले आहेत. त्या संदर्भात तक्रार करूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असे देसाई यांनी म्हटले आहे. केवळ तपास सुरू असल्याचे सांगत पोलिसांकडून प्रत्यक्षात नोंद घेतली जात नसल्याचे त्या म्हणाल्या. शरद पवारांचं नाव घेऊन विटेकर यांनी पीडितेला धमकावल्याचा गंभीर आरोप देखील देसाई यांनी केला. विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

विटेकर यांनी मात्र आपल्यावरील आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. बलात्काराचे आरोप साफ खोटे आहेत. केवळ आपल्याला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने आणि मला राजकीय जीवनातून संपवण्यासाठी हा प्रयत्न आहे, असे विटेकर यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आपल्याकडे अनेक पुरावे आहेत. आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे, असे विटेकर म्हणाले. विटेकर यांनी या प्रकरणी गंगाखेड न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोणत्याही पद्धतीने माझ्यावर कोणी आरोप करू शकत नाही, असे ते म्हणाले.

याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहबूब शेख यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते. या दोघांनीही ते आरोप फेटाळले होते. मुंडे यांच्याविरोधातील तक्रार नंतर मागे घेण्यात आली होती. ३९ वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणूनही ते काम पाहत आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेचे संजय (बंडू) जाधव यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -