महासंचालक पदाच्या यादीतून संजय पांडेंचे नाव केंद्राने हटवले

DGP Sanjay Pandey

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पॅनेलने महाराष्ट्राचे महासंचालक पदाच्या यादीतून प्रभारी महासंचालक संजय पांडे यांना वगळले आहे. आयोगाने निवडलेल्या तीन अधिकाऱ्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, के. व्यंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांचा समावेश आहे. या शिफारशींवर कार्यवाही करायची की नाही याचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असेल.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे हे या पदासाठी पात्र नसल्याची शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहे. मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पत्रव्यवहाराला आयोगाने उत्तर दिले असून पांडे यांच्या नावावर फुली मारली आहे. आयोगाने पांडे यांच्या जागी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली आहे.

जानेवारी २०२१ मध्ये पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल केंद्रीय प्रतिनियुक्तीवर रवाना झाल्यानंतर लगेचच हेमंत नागराळे यांना पोलीस महासंचालक बनवण्यात आले. परंतु युपीएससीकडे मंजुरीसाठी कोणताही प्रस्ताव पाठवला गेला नाही. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपानंतर परमबीर सिंह यांना काढून टाकण्यात आल्यानंतर नगराळे यांना मुंबईचे पोलीस आयुक्त बनवल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये संजय पांडे यांना प्रभारी पोलीस महासंचालक बनवण्यात आले. त्यानंतर १८ मार्च रोजी यूपीएससीकडे १९८६ बॅच ते १९८९ बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील १२ अधिकाऱ्यांच्या नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

आयोगाने ज्यांच्या नावांच्या शिफारस केली आहे, त्यामध्ये १९८८ च्या बॅचचे रजनीश सेठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आणि ते डिसेंबर २०२३ मध्ये निवृत्त होतील. १९८८ बॅचचे के व्यंकटेशम नागरी संरक्षणाचे प्रमुख म्हणून काम करतात. मुंबईचे पोलीस आयुक्त नागराळे हे १९८७ च्या बॅचचे असून ते ऑक्टोबर २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.