बीड – भारतीय जनता पक्षाचे सध्या चर्चेत असलेले आमदार सुरेश धस यांच्या जवळचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याला उत्र प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी प्रयागराज पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला आहे, आज संध्याकाळपर्यंत त्याला छत्रपती संभाजीनगर किंवा बीडमध्ये आणले जाणार आहे. दरम्यान अटकेनंतर खोक्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खोक्याने हरिण, मोर, ससा आणि इतरही वन्य प्राण्यांची शिकार केल्या प्रकरणी वन विभागाकडून त्याच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच वन विभागाच्या जमीनीवर अतिक्रमण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. वन विभागाने खोक्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहे.
खोक्या भोसले याला अटक करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे. सतीश भोसलेवर दोन जणांना बॅटने बेदम मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर खोक्या फरार होता. त्याला प्रयागराज येथे अटक करण्यात आले आहे. त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असून शिरुर, चकलांबा पोलिस ठाण्यात आणि तिसरा गुन्हा वनविभागाने दाखल केला असल्याचे नवीनत कॉवत यांनी सांगितले.
हेही वाचा : Suresh Dhas : कट्टर कार्यकर्ता खोक्याच्या अटकेची बातमी ऐकताच धस अण्णा म्हणाले…
वनविभागाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता
खोक्या उर्फ सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर 8 मार्च रोजी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. या झाडाझडतीत शिकारीसाठी लागणाऱ्या काही वस्तू आणि प्राण्यांचे वाळलेले मांस आढळून आले. हे सर्व साहित्य वनविभागाने जप्त केले. त्यानंतर त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. खोक्याने वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले असून तिथे तो राहतो. या प्रकरणीदेखील त्याच्यावर वनविभागाकडून गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील तीन महिन्यांमध्ये बीड मधील गुन्हेगारी चर्चेत आली आहे. हवेत बंदूक-रिव्हॉल्व्हर झळकावत रिल्स बनवणे, मारहाणाची व्हिडिओ, पैसे उडवतानाचे व्हिडिओ यामुळे बीड सध्या चर्चेत आहे. सतीश भोसलेने कैलास वाघ या व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर ढाकणे कुटुंबातील दोघांना मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आहे. धस हे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर धस आणि खोक्या यांचे फोटो – व्हिडिओ रोज समोर येत आहेत. दरम्यान सतीश भोसलेच्या अटकेनंतर आमदार धस यांनी चांगली गोष्ट आहे, त्याच्यावर ज्या ज्या कलमाने गुन्हे दाखल आहेत त्यानुसार पोलीस कारवाई करतील असे म्हटले.