Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील बेशिस्त रिक्षांचालकांवर होणार कारवाई, पोलीस व पालिकेच्या बैठकीत निर्णय

ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील बेशिस्त रिक्षांचालकांवर होणार कारवाई, पोलीस व पालिकेच्या बैठकीत निर्णय

Subscribe

ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर पश्चिमेकडे बेशिस्त रिक्षाचालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. याविरोधात आता ठाणे महापालिका आणि पोलीस संयुक्तपणे धडक कारवाई मोहीम हाती घेणार आहे. महापालिका प्रशासन, ठाणे पोलीस व वाहतूक पोलीस यांच्यामध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

ठाणे पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेरच्या परिसरात रिक्षाचालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे प्रवाशांना होणारा त्रास, अनधिकृत फेरीवाले, वाहतूक कोंडी याबाबत अनेक तक्रारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे आल्या होत्या. त्याआधारे तातडीने स्टेशन परिसरात दौरा करून ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर 150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. दररोज पाच लाखांहून अधिक प्रवासी ठाणे रेल्वेस्थानकातून प्रवास करतात. अशा वेळी रेल्वे परिसरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळावा, यासाठी रिक्षांचे परिचालन यामध्ये शिस्त असावी, याबाबत पालिका आणि पोलिसांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस वाहूतक पोलीस उपआयुक्त विनयकुमार राठोड, परिमंडळ 1चे पोलीस उपआयुक्त गणेश गावडे, महापालिकेचे उपआयुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हाताला धरून रिक्षामध्ये ओढत नेणे, अपेक्षित भाडे मिळेपर्यत आडमुठी भूमिका घेऊन रिक्षा रस्त्यातच लावून ठेवणे, भाडे नाकारणे, बेशिस्तपणे रिक्षा पार्किंग करणे, अनधिकृत रिक्षांचा वावर, महिला प्रवाशांना त्रास देणे, महिला रिक्षा चालकांना अन्य रिक्षा चालकांकडून होणारा त्रास, रेल्वेच्या हद्दीत उभे राहून प्रवाशांचा भाड्यासाठी पाठलाग करणे आदी स्वरूपातील तक्रारीं नागरिकांच्या आहेत. याच अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गेल्या वर्षभरात 500हून अधिक बेशिस्त रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर ही परिस्थिती बदललेली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यामुळे यापुढे ठाणे रेल्वेस्थानक परिसरात विशेष स्वरूपात पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यातून भाडे नाकारणारा रिक्षाचालक, बेशिस्तपणे पार्किंग करणारा रिक्षाचालक व अनधिकृत रिक्षाचालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बेकायदेशीर रिक्षा जप्त करण्यात येणार असून या कामात ठाणे महापालिकाही पोलिसांना सहकार्य करेल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

- Advertisement -

या परिसरात वातानुकूलित टॅक्सी स्टँड असून तो त्याच ठिकाणी दुसऱ्या लेनमध्ये सुरू केला तर खासगी वाहनांना जाण्यासाठी जी मार्गिका आहे ती खुली होईल, तसेच या परिसरात अधिकच्या दिव्यांची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. वातानुकूलित टॅक्सी स्टॅण्डबाबत प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित संघटनांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

रिक्षा संघटनांशी चर्चा करा
रिक्षावाल्यांच्या काही जुन्या संघटना असून त्या योग्य पद्धतीने व्यवसाय करतात. अशा संघटनांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण केले जाईल. त्यांना व्यवसाय करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल, याची काळजी घेण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या.

सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणार
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात यापुढे वाहतूक कोंडीवर नियंत्रण, तसेच रिक्षावाल्यांच्या मुजोरीला चाप बसविण्यासाठी पोलीसांची नेमणूक करण्यात येणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याचे नियंत्रण हे नौपाडा पोलीस ठाण्यात असेल. त्याप्रकारे नियोजन करण्याच्या सूचना पालिका आयुक्त बांगर यांनी दिल्या आहेत.

भिकारी, गदुल्ल्यांवर कारवाईच्या सूचना
मासुंदा तलाव हा परिसर ठाणे शहराचा मध्यवर्ती परिसर असून दररोज येथे नागरिकांची गर्दी असते. भिकारी-गर्दुल्ले यांचा त्रास या नागरिकांना होतो. त्यामुळे भिकारी आणि गर्दुल्ले यांचा वावर तलावपाळीवर राहणार नाही, या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही बांगर यांनी यावेळी दिल्या.

प्राणीप्रेमी नागरिकांनी ‘ही’ काळजी घ्यावी
अनेक नागरिक हे आपले पाळीव प्राणी घेऊन परिसरात फिरायला येत असतात, या प्राण्यांच्या विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होतो आणि त्याचा त्रास अन्य नागरिकांना सहन करावा लागतो. तरी प्राणीप्रेमी नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांच्या माध्यमातून परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही बांगर यांनी केले आहे.

- Advertisment -