घरमहाराष्ट्रकामाला लागा, सभा ओसंडून वाहिली पाहिजे; मविआ कार्यकर्त्यांना पवारांचं आवाहन

कामाला लागा, सभा ओसंडून वाहिली पाहिजे; मविआ कार्यकर्त्यांना पवारांचं आवाहन

Subscribe

मुंबई – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मोठी तयारी सुरू केली आहे. एप्रिल महिन्यापासून महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून संयुक्तपणे महाराष्ट्रभर सभा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातून या सभेला सुरुवात होणार आहे. ऊन, पाऊस, वादळ, अवकाळी पाऊस काहीही असो या सभा होणारच. या सभा टोलेजंग झाल्या पाहिजे. सभा ओसंडून वाहिल्या पाहिजेत, असा षड्डू अजित पवारांनी कार्यकर्त्यांना ठोकला. वाय.बी.चव्हाण सभागृहात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आहे.

अजित पवार म्हणाले की, २ एप्रिलपासून मोठ्या सभा घ्यायच्या आहेत. उद्धव ठाकरेंची खेडला ज्याप्रमाणे सभा झाली त्याचप्रमाणे मालेगावातही सभा होणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्याही सभा झाल्या पाहिजेत. त्यानुसार, २ एप्रिलपासून महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. जिथं तिथं महाविकास आघाडीच्या महाप्रचंड सभा झाल्या पाहिजेत. या सभांचा परिणाम सर्वदूर झाल्या पाहिजेत. २ एप्रिलपासून मराठवाड्याच्या प्रवेशद्वारापासून या सभेला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

या सर्व सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभा कुठे घ्यायच्या. कोणते दोन प्रतिनिधी बोलणार हे तिथे नेमून दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी ठरवायचं आहे. सभेचे प्रतिनिधी कोणीही असले तरीही महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी एकत्र येऊन ही सभा यशस्वी करायची आहे, असं अजित पवार म्हणाले. तसंच, या सभांसाठी जागा मोठी असली पाहिजे. सभा ओसंडून वाहिली पाहिजे. सर्वांत मोठी सभा कुठे होतेय हे पाहणार असून जो ताकदीने सभा करेल त्याला बक्षीस मिळणार आहे. याआधी कधी झाली नसेल आणि यापुढे होणार नाही अशी टोलेजंग सभा आपल्याला करायची आहे, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवलं.

कधी कुठे होणार सभा

- Advertisement -

२ एप्रिल रोजी मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजीनगर येथे पहिली सभा होणार आहे. या सभेला अंबादास दानवे पुढाकार घेतील. तर, दुसरी सभा १६ एप्रिल रोजी नागपूर येथे सभा होणार असून सुनील केदार या सभेचं प्रतिनिधित्व करणार आहेत. तिसरी सभा महाराष्ट्र आणि कामगार दिन १ मे रोजी राज्याची राजधानी मुंबईत होणार आहे. या सभेचं प्रतिनिधित्व आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. चौथी सभा १४ मे रोजी पुण्यात होणार असून याचं प्रतिनिधित्व अजित पवारांकडे आहे. २८ मे रोजी कोल्हापूरला सभा होणार असून त्यासाठी सतेज पाटील पुढाकार घेतील. ३ जून रोजी नाशिकमध्ये सभा होईल. तर, यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली ११ जून रोजी अमरावतीला सभा होणार आहे.

..तर फायदाच होतो

उन, पाऊस, वादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस काहीही असलं तरीही महाविकास आघाडीची सभा होणारच आहे. कोणत्याही आपत्तीमुळे सभा थांबणार नाही, असं सांगत असतानाच पावसात सभा झाली की फार फायदा होतो, असं म्हणत अजित पवारांनी हशा पिकवला. २०१९ च्या निवडणूक प्रचारावेळी शरद पवारांचं पावसातील भाषण गाजलं होतं, त्यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी हे वक्तव्य केलं.

लोकांच्या मनात रोष

शिंदे फडणवीस सरकारविषयी लोकांच्या मनात रोष आहे. त्यामुळे लोकांना आपल्याकडे वळवून घ्यायचं आहे. त्याकरता मोठ्या सभा घेतल्यास फायदा होईल, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -