हास्यजत्रा फेम अभिनेत्याच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ, अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोरेंना मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना सांस्कृतिक कोकण विभागाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

राष्ट्रवादीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात प्रभाकर मोरे यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. अजित पवारांच्या उपस्थितीत मोरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादीतच का प्रवेश केला याचं कारणंही सांगितलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे नेहमीच कलाकारांच्या मदतीसाठी पुढं आले आहेत. कोकणातल्या कलाकारांच्याही काही अडचणी आहेत. त्या मांडण्यासाठी, सोडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी पक्षात प्रवेश केलाय, असं प्रभाकर मोरे यांनी सांगितलं.

प्रभाकर मोरे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. प्रभाकर मोरे हे आपल्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक कलाकारांनी प्रवेश केला आहे. यात मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिका देखील सामील आहेत.


हेही वाचा : वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश