झाडांचं पुनर्रोपण सुरू असताना अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

अभिनेते सयाजी शिंदे हे त्यांच्या अभिनयासाठी जितके प्रसिद्ध आहेत, तितकेच ते त्यांच्या वृक्षारोपणाच्या कार्यासाठी देखील ओळखले जातात. असेच एका वृक्षाचे पुनर्रोपण सुरू असताना मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

Actor Sayaji Shinde was attacked by bees while tree replanting was in progress

गेल्या काही वर्षांपासून अभिनेते सयाजी शिंदे यांनी झाडे वाचविण्याचा वसा हाती घेतला आहे. सयाजी शिंदे हे कायमच जुनी झाडे वाचविण्यासाठी आणि त्यांचे पुनर्रोपण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशाच एका २०० वर्ष जुन्या झाडाचे पुनर्रोपण करण्यासाठी सयाजी शिंदे गेलेले असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतच स्वतः सयाजी शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती दिली आहे. त्यांच्या मानेला आणि डोळ्याच्या वरच्या भागावर मधमाशा चावल्या असल्याचे त्यांनाही सांगितले आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या इन्स्ट्राग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करत माहिती दिली की, “पुणे-बंगळुरू महामार्गावर सध्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये २०० वर्ष जुन्या झाडांची कापणी करण्यात येत आहे. पण ही झाडे वाचविण्याचा प्रयत्न आमच्याकडून करण्यात येत आहे. कारण २०० वर्ष जुनी झाडे मुळासकट कापून त्याच्या ऐवजी २-३ झाडे लावणे आणि त्याचा कधीही पाठपुरावा न होणे ह्यासाठी ही आहेत तीच झाडे वाचविणे सध्या गरजेचे बनले आहे. पण हेच काम करत असताना काही मधमाशांनी हल्ला केला. यातील २-४ मधमाशा या चावल्या. त्यामुळे कानाच्या मागे आणि मानेवर थोडी सूज आली आहे. पण काळजीचे काही कारण नाही.” अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून अभिनेते सयाजी शिंदे यांनी अनेक झाडे लावलेली आहेत. तर अशी अनेक जुनी झाडे आहेत, ज्यांचे त्यांच्याकडून पुनर्रोपण पण करण्यात आले आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेत, तितकेच आता ते त्यांच्या वृक्ष वाचविण्याच्या मोहिमेमुळे सुद्धा लोकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक झाडे लावली आहेत आणि अनेक झाडांचे प्राण सुद्धा वाचवले आहेत. पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारे सयाजी शिंदे हे मात्र खऱ्या आयुष्यात हिरो ठरलेले आहेत. झाडांसाठी त्यांच्याकडून जे काही काम करण्यात येते त्याबाबतचे व्हिडीओ आणि फोटो ते कायमच आपल्या सोशल मीडिया अकाउंटला शेअर करत असतात.


हेही वाचा – शहरात गावठी कट्ट्यांचा बोलबाला; पंचवटीत एकाला अटक