…तर हातात शस्त्रच असावं लागतं, शरद पोंक्षेंचं धारदार वक्तव्य

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे हे आपल्या धारदार वक्तव्यामुळे आणि त्यांच्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते स्वत: समाज माध्यमांवर सक्रिय असतात. तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षेंचे विचार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे. त्यांचा एका व्याख्यानातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी जर राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर हातात शस्त्रच असावं लागतं, असं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पोंक्षे?

इतिहास जर तुम्ही वाचलात. तर तुमच्या लक्षात येईल की, इतिहास हा नेहमी जेत्यांचा असतो. पराभूतांना इतिहास नसतो. पराभूतांचा कधीही कुणीही इतिहास लिहीत नाही. पराभूतांना भविष्य नसतं, वर्तमान नसतं आणि भूतकाळही नसतो, असं टॉलस्टॉयने म्हणून ठेवलं आहे. पण जेत्यांना ते असतं. शांती, अहिंसा हे जे आदर्श दाखवले जातात ना ते पोवाड्यांमध्ये, गाण्यांमध्ये बरे वाटतात. राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर हातात शस्त्रच असावं लागतं. शस्त्राशिवाय पर्याय नाही, असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

मागील काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर देखील टीका केली होती. लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या घरातल्या लग्नात मंत्र म्हटले असतील का?, अशा आशयाची फेसबुक पोस्ट पोंक्षेंनी करत अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली.


हेही वाचा :मंत्रांची टिंगल करून खिदळणारे मंत्री…, शरद पोंक्षेंची जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नानंतर टीका