घर मनोरंजन दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने केला राष्ट्रवादीत प्रवेश; म्हणाल्या, "वडिलांच्या विचारांना..."

दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने केला राष्ट्रवादीत प्रवेश; म्हणाल्या, “वडिलांच्या विचारांना…”

Subscribe

ज्येष्ठ सिने अभिनेते स्वर्गीय निळूभाऊ फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले, नृत्य दिग्दर्शक आशुतोष राठोड, निर्माते नितीन पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

Gargi Phule in NCP : ज्येष्ठ स्वर्गीय अभिनेते निळू फुले यांनी नेहमीच स्वतःला राजकारण आणि वाद यांच्यापासून दूर ठेवले. त्यांचे नेहमीच प्रत्येक राजकीय व्यक्तीसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. पण निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ मनगटी बांधले आहे. आज (ता. 30 मे) गार्गी फुले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला. माझ्या वडिलांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच न्याय देईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी खासदार सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

हेही वाचा – BJP Maharashtra: राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, भाजपच्या आमदाराचा दावा

- Advertisement -

या पक्ष प्रवेशानंतर गार्गी फुले यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ”मला अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. मला विचारणा झाल्यानंतर लगेचच मी हो म्हटलं. राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी व विचार आहेत त्याच विचारसरणीचे माझे बाबा निळू फुले होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते त्या विचारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस न्याय देईल.”

गार्गी फुले यांच्या राजकीय वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी गार्गी फुले यांना राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष, आशुतोष राठोड यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व नितीन पवार यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती पत्र अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय निळू फुले यांचे निधन होऊन 14 वर्षे झाली आहेत, तरी आजही चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. गार्गी फुले यांनी कधीही स्वतःच्या वडिलांच्या नावाचा वापर सिनेसृष्टीत जम बसविण्यासाठी केला नाही. गार्गी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीमधील एक उत्तम अभिनेत्री म्हणून नाव कमावले आहे. त्यांनी झी मराठी या वाहिनीवर ‘तुला पाहते रे’ या मालिकेत अभिनेत्री गायत्री दातारच्या आईची भूमिका साकारली होती. सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेत काम करत आहेत.

गार्गी फुले यांनी स्त्रीमुक्ती या विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. अभिनयाचे संस्कार तर त्यांच्यावर वडिलांनीच केले आहेत. सत्यदेव दुबे यांच्याकडून गार्गी यांनी अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. मराठी नाटक, मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलेले आहे.

- Advertisment -