घरमहाराष्ट्रअभिनेत्री प्रितिकासह दोघांना गांजा खरेदी-विक्रीप्रकरणी अटक

अभिनेत्री प्रितिकासह दोघांना गांजा खरेदी-विक्रीप्रकरणी अटक

Subscribe

नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी केली अटक

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एनसीबी) अधिकार्‍यांना आलेले यश, याच गुन्ह्यांत बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रीची झालेली चौकशीची घटना ताजी असताना शनिवारी एका अभिनेत्रीसह दोघांना गांजाचा खरेदी-विक्रीप्रकरणी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. फैसल मोहम्मद यासिन शेख आणि प्रितिका हकमसिंग चौहान अशी या दोघांची नावे आहेत. यातील प्रितिका ही मालिका अभिनेत्री असून तिने काही सिनेमातही काम केल्याचे सांगण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंधेरीतील वर्सोवा, मच्छीमार कॉलनीजवळ काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. काही वेळाने या पथकाला तिथे एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्यानंतर तिथे एक महिला आली, या दोघांमध्ये कुठल्या वस्तूची देवाणघेवाण सुरू असतानाच या पथकाने या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे या पथकाने 99 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. चौकशीत आरोपीचे नाव फैसल शेख आणि महिलेचे नाव प्रितिका चौहान असल्याचे उघडकीस आले. प्रितिका ही अभिनेत्री असून सध्या ती मालाड येथील एस. व्ही. रोड, दादी शेठ रोडच्या न्यू संगीता अपार्टमेंटमध्ये राहते. तिने संकटमोचन महाबली हनुमान या मालिकेत काम केले होते. तसेच झमेला या सिनेमातही तिची एक छोटी भूमिका होती.

- Advertisement -

गांजाची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध नंतर गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांना एनसीबीच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर फैसलला तळोजा तर प्रितिकाला भायखळा महिला कारागृहात पाठविण्यात आले होते. न्यायालयीन कोठडी सुनावल्यांनतर या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. सोमवारी या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -