मुंबई : मुंबईत पार पडलेल्या सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला होता. पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी आणि अदानींचे फोटो दाखवत ‘एक हैं तो सेफ’ चा नारा हा फक्त अदानी यांच्यासाठी असल्याचे आरोप केले होते. यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि अदानी यांचे जुने नाते असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धारावीच्या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला. (Adani and Congress have old relations says BJP Vinod Tawade)
“राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत एक तिजोरी काढली यामधून त्यांनी नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे फोटो काढले. असेच जर समजा फोटो काढायचेच आहेत तर, आम्ही देखील काही फोटो दाखवतो.” असे म्हणत विनोद तावडे यांनी अदानी आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो दाखवले. तसेच, त्यांनी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतचे फोटो दाखवले. तसेच काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांतील काही नेत्यांचे अदानी यांच्यासोबतचे फोटो दाखवले. “या फोटोंच्या माध्यामातून अदानी आणि कांग्रेसचे नाते कसे जुने आहे? म्हणजे अदानी यांचा खरा विकास हा 2014 च्या आधीच झाली आहे. म्हणजे चिमणभाई पटेल यांच्या काँग्रेसच्या सरकारने मुद्रा पोर्ट त्यांना दिला. मुलाखतीदरम्यान अदानी स्वतः म्हणाले होते की, माझा विकास हा राजीव गांधी यांच्या काळात झाली होती. अदानी यांचा विकास हा काँग्रेसच्या काळात झाला, हे यावरून समोर येते,” असे म्हणत विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
“ज्यावेळी काँग्रेसने तेलंगाणामध्ये 12, 400 कोटी रुपयांचा करार करण्यात आला, तेव्हा हे अदानी कोणाचे होते? राजस्थानमध्ये 46 हजार कोटी रुपयांचा सोलार प्रोजेक्ट अदानी यांच्याबरोबर करण्यात आला. तेव्हा अदानी कोणाचे होते?” असा सवाल यावेळी पत्रकार परिषदेत विनोद तावडे यांनी केला. “बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे असताना नियमावली बनवली होती. सेटलिंक होती आणि त्यामध्ये कंत्राट अदानींना मिळाले होते. जे लोक धारावीमध्ये राहतात त्या सर्वांना घरे मिळणार आहेत. धारावीत जे राहतात पण अधिकृत नाही त्यांनादेखील घरे देण्यात येणार आहेत. इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल गोष्टीदेखील मिळणार आहेत. 500 चौ. फुटाचा कार्पेट असा उल्लेख केला आहे. पण राहुल गांधी यांना धारावीकरांना झोपडीतच ठेवायचे आहे. शेख यांना ते कंत्राट मिळाले नाही म्हणून चिंता आहे का? एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है हे म्हणायचे का?” असे सवाल करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.