घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकची गावे गुजरातमध्ये सामील करा, राष्ट्रवादीची मागणी; कारण काय?

नाशिकची गावे गुजरातमध्ये सामील करा, राष्ट्रवादीची मागणी; कारण काय?

Subscribe

अजित पवारांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना खडेबोल सुनावले होते. राज्यातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ नये अशी मागणी वजा इशारा पवारांनी दिला होता. असं असताना राष्ट्रवादीकडून नाशिक जिल्ह्यातील गावे गुजरातमध्ये विलिन करण्याची मागणी करण्यात येतेय. 

नाशिक – पाणीप्रश्नावरून सोलापुरातील जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक राज्यात जाण्यास इच्छुक आहेत. यावरून महाराष्ट्रात वादंग निर्माण झाला आहे. आता, नाशिकमधूनही अशीच मागणी जोर धरू लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील काही गावांना गुजरातमध्ये विलिन करण्याची मागणी करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने या गावांना गुजरातमध्ये सामील करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाने केली आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला गेलेले असताना आता महाराष्ट्रातील गावेही गुजरातला जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ; जत तालुक्यातील ४० गावांचा सरकारला अल्टिमेटम

- Advertisement -

गुजरातमधील सीमावर्ती भागातील रस्ते, आरोग्य सेवा, पाणी, दळवळण, वीज पुरवठा इत्यादी नागरी सुविधा पुरवण्यास गुजरात सरकार महाराष्ट्राच्या खूप पुढे आहे. त्यामुळे नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवता येत नसतील, तर या गावांना गुजरातमध्ये विलिन करा अशी उद्विग्न मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी सुरगाणाच्या तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सुरगाणा तालुक्यातील समस्या काय?

- Advertisement -
  • रस्त्यांची दूरवस्था
  • सततचे भारनियम
  • पाणीटंचाई
  • सिंचन प्रकल्पाचा अभाव
  • मजुरीसाठी होणारे स्थलांतर

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटले. तरीही सुरगाणा तालुक्यातील अनेक गाव व पाडे सुख-सुविधांपासून वंचित राहिली आहेत. ग्रामीण भागातील गावांचा विकास करता येत नसेल तर ही सर्व गावे गुजरातमध्ये विलीन करा, अशा मागणीचे लेखी निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी सुरगाणाच्या तहसीलदारांना दिले आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकाचा दावा

दुसऱ्या राज्यासाठी राष्ट्रवादीचीच मागणी

जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामील होण्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच, राष्ट्रवादी पक्षाकडून महाराष्ट्र सरकारचा समाचार घेण्यात आला होता. अजित पवारांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना खडेबोल सुनावले होते. राज्यातील एकही गाव राज्याबाहेर जाऊ नये अशी मागणी वजा इशारा पवारांनी दिला होता. असं असताना राष्ट्रवादीकडून नाशिक जिल्ह्यातील गावे गुजरातमध्ये विलिन करण्याची मागणी करण्यात येतेय.

सोलापुरातील गावांना कर्नाटकचे वेध

सोलापूर तालुक्यातील पाणीप्रश्न पेटला आहे. तसंच, सीमाभागातील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेली अनेक गावे कर्नाटक सामील होण्यास इच्छूक असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला हातो. त्यानंतर, महाराष्ट्रात प्रचंड वादंग निर्माण झाला. महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा प्रकाशझोतात आल्याने जत तालुका पाणी कृती समितीनेही गावांना कर्नाटकात विलीन करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असल्याने यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील गावांना दुसऱ्या राज्यात विलिन होण्याची इच्छा व्यक्त केल्याने महाराष्ट्र सरकार कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -