शिवसेनेतील गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून निष्ठा यात्रेची घोषणा, महाराष्ट्र पिंजून काढणार

aditya thackeray

राज्यात ठाकरे सरकार कोसळलं असून गळतीचा पाढा संपायचं नाव घेत नाहीये. शिवसेनेत होत असलेली पडझड रोखण्यासाठी माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे उद्यापासून निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरेंची ही निष्ठा यात्रा महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात निघणार आहे. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात देखील आदित्य ठाकरे जाणार आहेत. तसेच ते येथील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

आदित्य ठाकरेंकडून निष्ठा यात्रेची घोषणा

शिवसेनेची गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रेची घोषणा केली. आदित्य ठाकरे हे मुंबईतला प्रत्येत मतदारसंघ आणि शाखा पिंजून काढणार आहेत. त्यांच्या या यात्रेची सुरूवात बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून होणार आहे. तसेच ते ठाकरे गटाकडे उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तसेच ते मार्गदर्शन देखील करणार आहेत.

निष्ठा यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईतल्या २३६ शाखांमध्ये जाऊन गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कडवट शिवसैनिकांनी शिवसेनेबद्दल दाखवलेली आत्मीयतेबद्दल संवाद करत निष्ठा यात्रा सुरु होणार आहे.

पदाधिकाऱ्यांच्या भेटी, मेळावे घेणार

याचवेळी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या राज्यातील ५० बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे “निष्ठा यात्रे” दरम्यान दौरा करणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या भेटी, मेळावे घेणार आहेत. या मतदार संघांमधील शिवसेनेशी एकनिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देऊन शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे.

महापालिका निवडणुकींच्या तोंडावर बंडखोर आमदार आणि पदाधिकारी फुटल्यानंतर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. काल देखील त्यांनी मातोश्रीवर शिवसैनिकांसोबत बैठक घेतली. यावेळी ठाकरेंनी बैठकीत शिवसैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. शिवसेना फक्त फोडायची नाही तर संपवायची आहे. त्यामुळे हे सर्व षडयंत्र रचलं जात आह, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

शिवसेनेची गळती थांबवण्यासाठी यश येणार का?

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये शिवसेनेच्या ६६ नगरसेविकांनी राजीनामा दिला. तसेच त्यांनी सुद्धा शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर निशाणा साधणारे आदित्य ठाकरे देखील आता अॅक्शन मोडमध्ये दिसत असून त्यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेची गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंना यश येतं का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : आम्हाला परत बोलवायचं असेल तर ठाकरेंना भाजपशी चर्चा करावी लागेल, केसरकरांनी बजावलं