घरमहाराष्ट्रठाकरे परिवार हेच तात्पुरत्या सत्ताधार्‍यांचे लक्ष्य

ठाकरे परिवार हेच तात्पुरत्या सत्ताधार्‍यांचे लक्ष्य

Subscribe

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिले. तुम्ही ५० थर लावले, पण खालच्यांना लाथ मारून वरच्यांनीच मलई खाल्ली. वॉर्ड पुनर्रचना, आरेचा निर्णय सरकारने स्वत:च्या स्वार्थासाठी घेतला आहे. त्यात कुठेही महाराष्ट्राच्या जनतेचे हित दिसून येत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यातील तात्पुरत्या सत्ताधारी पक्षाचे लक्ष ना शेतकर्‍यांवर, ना महिला अत्याचारांवर आहे. केवळ ठाकरे परिवार, शिवसेना परिवाराला लक्ष्य करण्याकडेच त्यांचे लक्ष आहे, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला. ते सोमवारी विधान भवनात माध्यमांशी बोलत होते.

दहीहंडी खेळणार्‍या गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा शासन निर्णय अजून हातात आलेला नाही. अनेक मंडळे यासंबंधी भेटत आहेत, पत्र पाठवत आहेत आणि नोकरीत ५ टक्के क्रीडा आरक्षण कधी, कसे मिळणार, असे विचारत आहेत. हे फक्त गोविंदांना दिलेले आश्वासन होते की धूळफेक होती. हे सर्व प्रकार राज्यासाठी, लोकशाहीसाठी घातक आहेत. हे सरकारच मुळात लोकशाहीविरोधी आणि राज्यविरोधी असल्याचे आता लोकांना वाटू लागले आहे, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.

- Advertisement -

शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाटांवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिरसाट यांच्या बोलण्यावर आता हसू येतंय. गद्दारी करून मिळालं काय? गद्दारी करणारी पहिली बॅच गेली. त्यातील किती लोकांचा विश्वास राखला गेला? त्यांचाही विश्वासघात नक्कीच झालेला आहे. त्यांच्यासोबतही गद्दारीच झालेली आहे. ज्या लोकांना शिवसेनेतून पुढे जाण्याची संधी होती, त्यांचीही राजकीय कारकीर्द या गद्दारीतून खराब झाली याचे वाईट वाटते.

दीपक केसरकरांना मिळालेल्या पर्यावरण मंत्रीपदावरही आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे. दीपक केसरकर यांना न आवडणारे खाते मिळाले आहे. माझी सहानुभूती त्यांच्यासोबत आहे. त्यांना जे खाते मिळाले तेदेखील महत्त्वाचे आहे. जो विकास आम्ही पर्यावरण खात्याच्या माध्यमातून केला तो आता त्यांनी करून दाखवावा, असे आव्हानही आदित्य ठाकरेंनी त्यांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -