राज्यपाल हटविण्यासाठी मोहीम राबवली पाहिजे, आदित्य ठाकरेंची खोचक टीका

aaditya thackeray

मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल हे राज्यपाल नसून राजकीय नेते आहेत. या राज्यपालांनी आम्हाला सत्तेतून बाहेर काढून टाकले. विधानसभा अध्यक्ष आमच्या काळात नेमला गेला नाही. मात्र, सरकार बदलल्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्ष नेमले गेले. तसेच राज्यपालांनी विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांचा विषय प्रलंबित ठेवला. त्यामुळे हे राजकीय राज्यपाल हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे, असे मत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.

आज बोरिवलीत युवा सेनेने महायुथ फाऊंडेशनच्या सहकार्याने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. हे राज्यपाल राज्यासाठी चालणार नाहीत. हे राज्यपाल नसून राजकीय नेते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी रामदेवबाबा यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला. रामदेव बाबांचे विधान अतिशय दुर्दैव आहे. आपण महिलांकडे कसे बघतो? असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरही टीका केली. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला चालले आहेत. बेरोजगारी वाढत आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी फिरत आहेत. आता गुवाहाटीला गेलेत तिथून आणखी कुठे जाणार?, असा सवाल करत महाराष्ट्रासाठी काम करायचे त्यांच्या मनात कधीच नव्हते,असा आरोप त्यांनी केला. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणारा मुख्यमंत्री राज्यासाठी काहीच करत नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

सरकार पडेल पण मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही

आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरूनही शिंदे गटाला लक्ष्य केले. सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे वारंवार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सांगितले जात आहे. मात्र हे सरकार पडेल पण मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. विस्तार होत नाही, त्यामुळेच विस्ताराच्या विमानाने फिरत आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.


हेही वाचा : ठामपाच्या सुरक्षा विभागामार्फत रक्तदानाद्वारे 26/11मधील शहिदांना वाहिली आदरांजली