मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आपलं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांकडे वळवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र अंधेरी येथील क्रीडा संकुलात आयोजित मेळाव्यात आमदार आणि खासदारांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे टेंशन वाढलं आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र अदानींच्या हातात द्यायचा असेल तर जरूर त्यांनी गद्दारी करावी, असा इशारा त्यांनी दिला. (Aditya Thackeray criticizes leaders absent from Shiv Sena Thackeray group rally)
पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की, कालच्या मेळाव्याला राजन साळवी उपस्थित नव्हते. अशीही चर्चा आहे की, रत्नागिरीतून माजी आमदार आणि काही पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत, असे समजते. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, जे कोणी आमच्या सोबत या महाराष्ट्रासाठी लढत आहेत, या मातीसाठी लढत आहेत, महाराष्ट्राच्या मातीसाठी लढत आहेत, महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी लढत आहेत, ते आमच्या सोबत आहेत. बाकी आम्ही कोणालाच थांबवलं नाही. आम्ही एवढंच सांगतोय की, महाराष्ट्राशी गद्दारी करू नका. तुम्ही काल पाहिलं असेल, तर अदानी आता मदर डेरीच्या तिथे जमीन खायला निघालेत, धारावी खायला निघालेत. त्यामुळे महाराष्ट्र जर अदानींच्या हाती द्यायचा असेल, ज्यांना गद्दारी करायची आहे, त्यांनी जरूर करावी. पण त्यांचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
हेही वाचा – Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरेंचा सवाल, हास्यास्पद करार केल्याचा आरोप
या नेत्यांची मेळाव्याला उपस्थिती
दरम्यान, अंधेरी येथील क्रीडा संकुलात शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला अनेक आजी-माजी आमदार आणि खासदार गैरहजर असल्याचे पाहायला मिळाले. माजी आमदार राजन साळवी, वैभव नाईक, आमदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बंडू जाधव, खासदार संजय देशमुख, आमदार दिलीप सोपल यांच्यासह अनेक विद्यमान आमदार आणि खासदारांची अनुपस्थिती दिसली. महत्त्वाचे म्हणजे माजी आमदार वैभव नाईक आणि राजन साळवी हे सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कारण मागील दिवसांपासून वैभव नाईक आणि राजन साळवी हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : पवारांसोबतच्या लिखापढीनंतर भुजबळांच्या अमित शहांशी गुजगोष्टी