मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर काही दिवसांनी त्याची सेक्रेटरी दिशा सालियन हिनेही आत्महत्या केली होती. या दोघांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारत त्यांना त्यांचे म्हणणे 2 आठवड्यात सादर करण्याचे सूचवले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Aditya Thackeray files application in Mumbai High Court in Disha Salian death case)
दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या आदित्य ठाकरे यांनी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी केले होते. मात्र दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेत यात आदित्य ठाकरेंचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. असे असले तरी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील याचिकाकर्त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल करून त्यांनी दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
राशिद पठाण यांनी याचिकेतून म्हटले की, 8 जून 2020 रोजी दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाइल लोकेशन तपासण्यात यावे. कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच 13 आणि 14 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाइल लोकेशन तपासले जावे. याशिवाय या दोन्ही दिवशी आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा – Eknath Shinde : लोकांचा म्हाडाच्या घरावर विश्वास वाढतोय, शिंदेंकडून भावना व्यक्त
राशिद पठाण यांनी म्हटले की, सुशांतसिंहचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणे झाले? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित होणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी. तसेच भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतच्या आरोपांचीही सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. मात्र आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय? असे म्हणत उच्च न्यायालयाने राशिद पठाण यांना फटकारले.
आदित्य ठाकरेंकडून स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल
न्यायालयाने राशिद पठाण यांना याचिकेतील मुद्द्ये दोन आठवड्यात गुणवत्ता आधारावर पटवून द्यावे, असं स्पष्ट करत दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पाचबोला यांनी या सुनावणीत आपलीही बाजू ऐकून घ्यावी, यासाठी स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल करत जोरदार युक्तिवाद केला. तर याचिकाकर्त्यांचे वकील निलेश ओझा यांनीही त्यांच्या युक्तीवादावर हरकत घेतली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अधारे यांनी हस्तक्षेप करत ‘अनेक तपास एजन्सी तपास करत आहेत. मग, तुम्हाला हे आरोप का करावेसे वाटतात?’ असा त्यांना प्रश्न विचारला.
हेही वाचा – Maharashtra Politics : जिकडे सत्ता तिकडे ते, खडसेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने चंद्रकांत पाटलांचा टोला