घरमहाराष्ट्रमुंबई महापालिका निवडणूक घेतली जात नाही कारण, आदित्य ठाकरे म्हणाले...

मुंबई महापालिका निवडणूक घेतली जात नाही कारण, आदित्य ठाकरे म्हणाले…

Subscribe

महाराष्ट्र आणि मुंबईतील वातावरण हे शिवसेना आणि महाविकास आघाडीसाठी चांगले आहे, असे अहवाल भाजप आणि खासगी सर्व्हेकडून येत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत.

मुंबई – शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्या शिवगर्जना अभियान सुरु आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (12 मार्च) गोरेगावमध्ये शिवगर्जना सभा आयोजित करण्यात आली आहे. यात आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. (Aditya Thackeray Rally in Goregaon Mumbai)

मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती आणि पुढची २५ वर्षेही शिवसेनेचीच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ता राहाणार आहे, असे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. गोरेगाव येथे आयोजित शिवगर्जना सभेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपचा समाचार घेतला. मुंबई महापालिकेचे ९० हजार कोटींच्या ठेवींवर त्यांचा डोळा आहे. ते कशासाठी ठेवले आहे, याचीही यांना माहिती नाही. यांना आणखी आमदार खरेदी करायचे असतील, तेवढ्यासाठीच त्यांचा या ठेवींवर डोळा असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

शिंदे -फडणवीसांचे सरकार हे सामान्य माणसाचे सरकार नाही, तर बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार आहे. नको तिथे यांनी टोल लावले आहेत. बेस्ट सारखी सेवा जगात कुठेही नाही. त्यात सुधारणा करण्याचा आमचा प्लॅन होता. मात्र तो आदित्य ठाकरेंनी मांडलेला आहे, म्हणून रद्द करुन टाकला आहे, असाही आरोप आदित्य यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान ही कल्पना आमची होती. मात्र आता त्यावर दोन जणांचे फोटो झळकत आहेत. दवाखाने सुरु केले मात्र तिथे औषधी नाही, डॉक्टरांना पगार नाही, अशी स्थिती आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रातून उद्योग आणि कार्यालये पळवले जात आहे. मात्र एक गोष्ट अजून शिल्लक आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय, ते अजून महाराष्ट्र, मुंबईतच आहे. मात्र ते चालवले जाते दिल्लीतून, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला लगावला आहे.

- Advertisement -

ते म्हणाले, शिवसेनेत झालेली गद्दारी कोणालाही आवडलेली नाही. भाजप आणि खासगी संस्थांकडून सध्या विविध सर्व्हे होत आहेत. त्यात त्यांना महाराष्ट्रातील चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर केली जात नाही, असा दावा आदित्य यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी पन्नास खोके, एकदम ओकेची घोषणा दिली. यावेळी ते म्हणाले, या चाळीस लोकांपैकी आता अनेक जण खासगीत भेटून आम्हाला शिवसेनेत परत यायचं असल्याचं बोलत आहेत. उद्धव साहेब आम्हाला शिवसेनेत परत घेतील का, असा प्रश्न करत आहेत. मात्र आता प्रश्न पडतो की या ४० लोकांसोबत आपण एवढे दिवस का सोबत राहिलो.

कोविडच्या काळात महाराष्ट्र सरकारने जे काम केले त्याचे कौतुक जागतिक पातळीवर झाले. उद्धव ठाकरे हे रोज अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायचे. त्यांना सूचना देत होते. डॉक्टर, औषध कंपन्या यांच्यासोबत ते संपर्कात होते. त्यामुळेच मुंबई पॅटर्न, धारावी पॅटर्नची देशभरात चर्चा झाली, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्याच वेळी त्यांनी गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये, सूरतमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काय स्थिती तुम्ही पाहिली. तेव्हा विदारक चित्र दिसत होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. मात्र आताचे मुख्यमंत्री हे फेसबुक लाईव्ह करतात आणि देशाचे पंतप्रधानच बदलून टाकतात, असा टोला एकनाथ शिंदेंचे नाव न घेता लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -