मुंबई : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम आणि उद्यान निर्मिती पूर्ण झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या स्मारकाची पाहणी केली. यानंतर ठाकरे पिता-पुत्रांनी पत्रकार परिषद घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बाळासाहेबांनी जीवनात काय घडवलं याचं दर्शन राष्ट्रीय स्मारकात होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. (Aditya Thackeray reaction after the completion of the first phase of Balasaheb Thackeray National Memorial)
आदित्य ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, रिव्ह्यू मिटींग झाल्या, साईट व्हिसीट झाल्या. तुम्ही जर पाहिलं असेल तर सर्व स्मारकामध्ये पुतळा असतो. पण ती संकल्पना बाजूला ठेवून बाळासाहेब ठाकरे यांनी जीवनात काय नक्की काय घडवलं, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काय केलं, त्यांच्या जीवनाचं काम असो, हे पहिल्या टप्प्यात आलं आहे. तसेच समाजकारण आणि राजकारणातील त्याचं योगदान पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे. आर्किटक्टरचं काम आज पूर्ण झालेलं आहे. ते आज आम्ही जनतेसमोर आणत आहोत. यानंतर दुसऱ्या टप्प्याचं काम पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – Uddhav Thackeray : फक्त पुतळे उभारणे म्हणजे स्मारक नव्हे; काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आदित्य ठाकरेंचे जनतेला भावूक आवाहन
दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक नरिमन पॉईट येथे जाणार होतं. मग सरकार बदललं आणि अनेक गोष्टी झाल्या. पण बाळासाहेब ठाकरे याचं याठिकाणीशी काही ना काही नातं आहे. अर्थात सर्व मुंबईशी त्याचं नात आहे. राष्ट्रीय स्मारक घडत असताना यावर लक्ष केंद्रीत करून मला काम करायचं होतं. पहिली गोष्ट म्हणजे सीआरझेड, दुसरं म्हणजे हेरिटेज वास्तू, तिसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचा आदेश होता की, एकही झाड न तोडता स्मारकाचं काम केलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे अनेक महापौर याठिकाणी राहिले आहेत. त्यांना माहित आहे की, पावसाळ्यात वारे वाहत असताना ज्या लाटा येतात, त्यामुळे हा बंगला देखील हादरायचा. त्यामुळे स्मारकाला नुकसान होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली. तसेच हे स्मारक बनत असताना ते जागतिक दर्जाचा करण्याचा आमचा प्रयत्न होता. पहिला टप्पा आज आपण पूर्ण केला आहे. त्यामुळे जर कोणाकडे माझ्या आजोबाबद्दल काही आठवणी असतील तर त्याचं योगदान आम्हाला लागणार आहे, असे भावूक आवाहान आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले आहे.