उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली – आदित्य ठाकरे

२० मेला मुख्यमंत्र्यांनी शिंदेना वर्षावर बोलवलं होते. त्यांना थेट विचारले होते तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असं विचारले होते. परंतु तेव्हा नाटक केलं आणि २० जूनला जे व्हायचे होते ते झालेच.

aditya thackeray

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा खुलासा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे नाराज होते. अनेकवेळा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. २० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली परंतु त्यावर एकनाथ शिंदे नाही म्हणाले. परंतु २० जून रोजी त्यांनी बंड केले असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच काय होतात तुम्ही आणि काय झालात असे म्हणत मला आता बंडखोर आमदारांची अवस्था बघून हसायला येत असं आदित्य ठाकरे म्हणाले.

युवासेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बंडखोर आमदारांवर तुफान फटकेबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मला येतानाही काही लोकांनी विचारले तुम्हाला कसं वाटत आहे? राग आलाय, दुःख वाटत आहे. कसं वाटत आहे. त्यावर म्हणालो मला शिवसैनिकांचे प्रेम पाहून आनंद वाटत आहे. तसेच पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात कुठेही घाण साठू देऊ नये. घाण आता गेला आहे याचा मला आनंद आहे. २० जूनपासून जी काही कुणकूण सुरु होती. २० मेला मुख्यमंत्र्यांनी शिंदेना वर्षावर बोलवलं होते. त्यांना थेट विचारले होते तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असं विचारले होते. परंतु तेव्हा नाटक केलं आणि २० जूनला जे व्हायचे होते ते झालेच. आता जे काही आमदार उरले आहेत त्यांच्याकडे पद नाहीत. परंतु शिंदेंसोबत असलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत.

शिंदेंना मुख्यमंत्र्यांनी मोठं खातं दिलं

आमदारांचे व्हिडीओ समोर येत आहेत. काल तर एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. काय परिस्थिती करुन घेतली आहे. काय मान होता आणि सन्मान मिळत होता. शिवसेनेत नंबर दोनचे नेते म्हणून वागत होते. जे खात मुख्यमंत्री सोडत नाहीत ते खातं शिंदेंना देण्यात आले होते. पक्षात सुद्धा त्यांचे वजन होते. बाकीचे काही मंत्री आणि आमदार गेले आहेत. त्यांना जो मान सन्मान मिळत होता. विदेशातही महाराष्ट्र मॉडेलच कौतुक करत आहेत.

स्वतः विकले गेले आणि दुसऱ्यांना विकण्याचा प्रयत्न

मी काही आयपीएलमधला खेळाडू नाही जे बोली लावून स्वतः पळाले आहेत. या फुटीरवाद्यांसारखा आपण कोणी नाही. आपले दरवाजे खुले आहेत. ज्यांना जायचे आहे त्यांच्यासाठी पण खुले आहेत. ज्यांना यायचे आहे त्यांच्यासाठीसुद्धा खुले आहेत. जे चांगले आहेत. जे आपल्यासोबत मनाने ह्रदयाने जोडलेले आहेत. त्यांच्यासाठी फक्त दरवाजे खुले आहेत. जे स्वतःला विकून गेले आणि दुसऱ्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला त्यांना दरवाजे खुले नाहीत. त्यांच्यासाठी आता महाराष्ट्राचेसुद्धा दरवाजे खुले नाहीत.

काल जो व्हिडीओ फिरत होता परंतु त्या पूर्वी सुरतवरुन गुवाहाटीला जातानाचा व्हिडीओ पाहा. वेगळ्यावेगळ्या माध्यमांवर दाखवण्यात आला आहे. आमदारांना कैद्यांसारखे फरफटत नेत होते. हे मान्य आहे का? शिंदेंना तरी हे मान्य आहे का? त्यांना तरी मान्य आहे का? की त्यांना सांगितले होते तुम्ही बंड करा आम्ही तुम्हाला कैदी करतो. असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आपण यांच्यासाठी काय कमी केले आहे. शिवसेनेची ही ताकद आहे की सामान्य माणसाला ओळख देण्याची असे आदित्य ठाकरे म्हणाले.

फुटीर आमदारांकडून उमेदवार पाडण्याचे काम

आपण कुठून आलो आणि कुठे पोहोचलो? कोणी दिले हा जर विचार करायला लागले तर त्यांना आरशात बघायला लाज वाटेल अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. महापालिका, लोकसभा, विधानसभेची तिकीट द्यायचे बघितले तर राज्यसभेच्या वेळी संजय राऊत आणि संजय पवार यांना तिकीट दिले. परंतु संजय पवार यांना पाडण्याचे काम या फुटीर आमदारांनी केलं आहे. सचिन आहीर आणि आमशा पाडवी यांना विधानपरिषद निवडणुकीमध्ये तिकीट दिले. कोणी यांचे नाव नव्हते ऐकले परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रत्येकावर प्रेम असते. प्रत्येकावर विश्वास आणि लक्ष असते.


हेही वाचा : शिंदे गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफची टीम तैनात