आपलं महानगरच्या बातमीची आदित्य ठाकरेंकडून दखल; ‘हा काय गोंधळ’ म्हणत मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

26 जानेवारी रोजी 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे 45 दिवसांनंतरही इतिवृत्तांत नसल्याची बातमी आपलं महानगरनं दिली होती, त्याची खुद्द शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी दखल घेतली आहे

मुंबईः 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे 45 दिवसांनंतरही इतिवृत्तांत नाही या मथळ्याखाली 26 जानेवारी रोजी आपलं महानगरमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली असून, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. 26 जानेवारी रोजी 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे 45 दिवसांनंतरही इतिवृत्तांत नसल्याची बातमी आपलं महानगरनं दिली होती, त्याची खुद्द शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी दखल घेतली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 13 डिसेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या इतिवृत्तांताला अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याचं मला समजलं. त्याला बैठकीला जवळपास एक महिना उलटून गेला. चार कंपन्यांच्या इतिवृत्तांताला मंजुरी न देता ती नवीन गुंतवणूक येत असल्याची घोषणा केली हा काय गोंधळ आहे, असं ट्विट करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला.


जुनीच गुंतवणूक नवीन दाखवल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप

विशेष म्हणजे 13 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत 70 हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना मिळून 55 हजार रोजगार निर्मितीचा दावा सरकारने केला होता, परंतु मंत्रिमंडळ उपसमितीने यासंदर्भातील प्रस्तावांना मंजुरी देऊन जवळपास 45 दिवस उलटून गेले तरीही या 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांच्या बैठकीचे इतिवृत्तांत अद्याप मंजूर झाले नसल्याची माहिती आपलं महानगरला मिळाली आहे. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचवत सांगितलेली ही गुंतवणूक राज्यात प्रत्यक्षात येणार कधी आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार कधी, असा प्रश्न विचारला जात होता. तोच धागा पकडत आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे.


मुख्यमंत्री 28 तासांच्या 40 कोटी दौऱ्याचा हिशेब कधी देणार?

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरही आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र डागलं आहे. इतर राज्यातील मुख्यमंत्री (मुंबईत) येथे येतात आणि करोडोंची गुंतवणूक घेऊन जातात. इथून मुख्यमंत्री दावोसला गेले, 28 तासांच्या दौऱ्यावर 40 कोटी रुपये खर्च केले, त्याची सार्वजनिकरीत्या कुठेही माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याला 10 दिवस झाले तरीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे वेळापत्रक आणि कुठलेही फोटो नाहीत. दावोस दौऱ्यावर एवढा खर्च करून काय मिळवलं याचा कुठलाही तपशील नसल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. या असंवैधानिक सरकारमधील अशा अनागोंदीमुळे आपण गुंतवणूकदारांना कोणते संकेत देत आहोत?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.