राजकारणातच नव्हे तर प्रदूषणाबाबतही सरकार ‘ओक्के’, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Aditya Thackeray on Climate Change | राजकारणाप्रमाणेच हे सरकार शहरातील प्रदूषणाबाबत ओके आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आज त्यांनी ट्विट करून राज्य सरकारवर आगपाखड केली.

mva shivsena aditya thackeray, bjp, devendra fadanvis, tata airbus project

Aditya Thackeray on Climate Change | मुंबई – मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील वायू प्रदूषणात (Air pollution) वाढ झाली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांकही (Air Quality Index) घसरला असल्याने नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Former Environment Minister Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. राजकारणाप्रमाणेच हे सरकार शहरातील प्रदूषणाबाबत ओके आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आज त्यांनी ट्विट करून राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मुंबई आणि एमएमआर विभागात वाईट ते अतिवाईट (Poor to Very Poor) असा नोंदवला गेला आहे. थंडी वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माझ्यासह या शहरातील अनेक नागरिक दर आठवड्यात याविरोधात आवाज उठवत आहोत, पण हे असंवैधानिक सरकार गप्प आहे. वाईट AQI असणाऱ्या अनेक राज्यांनी नियमावली जाहीर केली आहे. परंतु, आपल्या सरकारने शाळा/कार्यालयांना आरोग्याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली नाहीत. मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू असल्याने धूळीचे प्रमाण वाढले आहे. म्हणजेच राज्य सरकार सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करत असल्याचं दिसत आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक शहरातील क्लायमेट अॅक्शन प्लानमध्ये मी एक पर्यावरण मंत्री म्हणून सहभागी होतो. पण हा प्लानच आता बंद झालेला आहे. आम्ही राबवलेले MCCC, EV धोरण, MCAP, धूळ कमी करण्याच्या उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत. सरकारने याबाबत बोललं पाहिजे. AQI हा जीवनमानाचा एक प्रमुख भाग आहे. दुर्दैवाने राजकारणाप्रमाणेच हे बेकायदा राज्य सरकार आपल्या शहरातील प्रदूषणाबाबतही ओके आहे, असं आदित्य ठाकरेंनी ट्वीट केलं आहे.


गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा दिल्लीपेक्षा वाईट होत असल्याचं हवेचा गुणवत्ता निर्देशांकातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याची मागणी केली जात आहे. वाढते शहरीकरण, बांधकाम, वाहतूक कोंडी यामुळे शहरात वायू प्रदूषण वाढले असून धुळीचे कणही वातावरणात आढळत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वांची गरज आहे. परंतु, सरकारकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, मुंबईतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबई हवामान कृती आराखडा बनवला आहे. या आराखड्यानुसार हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपोययोजना सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.