मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी महायुतीकडून सरकार स्थापन होताना दिसत नाहीय. त्यामुळे महायुती सरकारमधून मुख्यमंत्रीपदाची संधी कोणाला मिळणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? तसेच कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. मात्र काही वेळापूर्वीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त सांगितला आहे. याप्रकरणी आता विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे कधीपासून राज्यपाल झाले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Aditya Thackeray venomous criticism of Chandrashekhar Bawankule for giving information about the Mahayuti oath ceremony)
माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांना नव्या सरकारच्या शपथविधीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मुख्यमंत्री होणार कोण? हे कुठे अजून ठरलेलं आहे, अशी टीका त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, दुसरी गंमत अशी आहे की, एका पक्षाच्या तसेच राज्याच्या अध्यक्षांनी शपथविधीची तारीख आणि मुहूर्त ट्वीट करून सांगितलं आहे. खरं तर शपथविधीबाबत माहिती देण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. चंद्रशेखर बावनकुळे कधीपासून राज्यपाल झाले? मुळात त्यांनी जे स्वत: ट्वीट केले आहे, मला प्रश्न विचारायचा आहे की, आपला देश कधीपासून ट्विटरवर चालायला लागला आहे. शपथविधीची तारीख आणि मुहूर्त याबद्दलची माहिती राज्यपालाच्या ऑफीसमधून यायला पाहिजे होती. पण त्याचं हे सर्व नाटक नेहमीच चालू राहणार आहे. त्यांनी आता लोकांच्या कामाला लागलं पाहिजे होतं. सहा दिवस होऊन गेले, तरी हे लोकं बैठका घेताना दिसत आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी
विश्वगौरव माननीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) November 30, 2024
महायुती सरकारचा शपथविधी कधी?
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना महायुतीच्या शपथविधीची मुहूर्त सांगितला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील आणि देशातील संपूर्ण जनता महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह कधी होणार? याची वाट बघत आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, तो आनंदाचा क्षण आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी 5 वाजता शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली होती.