नैतिकता असेल तर भाजपच्या मतांवर निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा – आशिष शेलार

उद्धवजी स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाही, तुम्ही देश वाचवायच्या काय गोष्टी करता? पहिले घरापासून पक्षापर्यंतची उजळणी करा. मग मोठ्या मोठ्या बाता करा.' असा आमचा त्यांना मैत्रीचा सल्ला असल्याचे सांगत टोला लगावला आहे.

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा गुरुवारी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. शिंदे – फडणवीस यांचे सरकार कोर्टाने मान्य केले आहे. मात्र त्यासोबतच शिंदे गट, राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे की शिंदे – फडणवीसांमध्ये जराही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. यावर आता भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांनी आज (शुक्रवार) सकाळी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी जाहीर झालेल्या निकालाचे विश्लेषण केले. त्यानुसार, एकनाथ शिंदेंचे गटनेतेपद सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरविले आहे. त्यासोबतच त्यांनी नेमलेले प्रतोद गोगावले यांची नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने शिंदे – फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर आमदार शेलार म्हणाले,
‘जे उद्धवजी स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाही, स्वतःच्या पक्षातील आमदार वाचवू शकले नाहीत, आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री वाचवू शकले नाही. स्वतःच्या परिवारातील सख्ख्या भावाचं प्रेम वाचवू शकले नाही. परिवारातील आणि पक्षात काम करणाऱ्या चुलत भावाचा विश्वास संपादन करु शकले नाही. परिवारातील वहिनींचं प्रेम घेऊ शकला नाहीत. पक्ष सोडून जाणाऱ्या नगरसेवकांना जवळ ठेवू शकले नाहीत. तुम्ही देश वाचवायच्या काय गोष्टी करता? पहिले घरापासून पक्षापर्यंतची उजळणी करा. मग मोठ्या मोठ्या बाता करा.’ असा आमचा त्यांना मैत्रीचा सल्ला असल्याचे सांगत टोला लगावला आहे.

‘नैतिकता, हिंमत आणि मर्द या शब्दांवर उद्धवजींच प्रेम आहे. तुमचे सुपुत्र आमच्या मतांवर निवडून आले आहेत. नैतिकतेने आमच्या मतांवर त्यांचा विजय झाला आहे. मर्द असाल तर तुमच्या आमदारांना तुमच्या सुपुत्रासह नैतिकता, हिंमत दाखवत राजीनामा द्यायला लावा आणि निवडणुकीला सामोरे जा आणि मग आम्हांला नैतिकतेचे सल्ले द्या’, असा टोला शेलारांनी लगावला आहे.

सवाल साधा सरळ आहे, तुम्ही कोर्टात कशाला गेला होतात? हे सरकार अवैध घोषित करण्यासाठी गेला होता ना? करू शकला का? तर उत्तर नाही.
तुम्ही कोर्टात गेला होता 16 आमदाराला अपात्र करण्यासाठी.16 आमदार अपात्र करू शकला का? तर नाही. तुम्ही न्यायालयात गेला होतात, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलण्यासाठी? तुम्ही विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकला का? तर नाही. तुम्ही कोर्टात गेला होतात राज्यपाल महोदयांनी घेतलेल्या भूमिका चुकीच्या आहेत, त्या बदलल्या पाहिजेत हे करण्यासाठी. मग तुम्ही राज्यपालांचा निर्णय बदलू शकलात का ? तर त्याचे उत्तरही नाही असेच आहे. तुम्ही कोर्टात गेला होता आम्हाला पुन्हा सत्तेत बसवा हा निवाडा मागण्यासाठी, तुम्हाला सत्तेत बसवण्याचा निवाडा आला का? तर नाही. तुम्हाला शिंदेंना अवैध ठरवायचं होतं म्हणून तुम्ही न्यायालयात गेलात तर सरकारला अवैध ठरवू शकलात का? तर नाही.
त्यामुळे सलग सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही अशी आहेत. तुम्ही केलेली मागणी आणि कोर्टाकडून मिळालेले उत्तर हे नकारात्मक असल्यामुळे तुमचा सत्ता सरपटूपणा आता इथपर्यंत गेला की ‘गिरे तो भी टांग उपर’ असा टोला उद्धव ठाकरेंना शेलारांनी लगावला.