घरमहाराष्ट्रबरे झाले ते गेले, कारण...; शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांची बंडखोरांवर टीका

बरे झाले ते गेले, कारण…; शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांची बंडखोरांवर टीका

Subscribe

दापोली : आमदार आहात लोकोपयोगी कामं करा, भाईगिरी करू नका, असा सज्जड दम शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दापोली येथे दिला. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शुक्रवारी दापोली येथे धडकली. या गद्दारांचे कारनामे बघा कोणी पिस्तूल काढतो, कोणी धमकावतो! आता मला वाटते की, बरे झाले ते गेले, कारण नवीन 40 जणांना संधी देता येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा पाचवा टप्पा रत्नागिरी, चिपळूण दापोली येथे पार पडला. यावेळी खेड-दापोलीत आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. दापोली येथे आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना बंडखोरांवर जोरदार हल्ला चढवला. बंडखोर आमदार योगेश कदम तसेच माजी आमदार रामदास कदम यांचा उल्लेख न करता त्यांनी सज्जड दम भरला. मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसल्याची खंत व्यक्त करतानाच, ‘प्राण जाए पर वचन न जाए’, या मार्गावर आपले मार्गक्रमण सुरू असून आताचे घाणेरडे राजकारण बदलण्यास माझ्यासोबत तयार राहा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी तेथील युवकांना केले.

- Advertisement -

मित्रांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. काय कमी केले ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला? कठीण काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडले, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. हे सरकार घटनाबाह्य असून मी तात्पुरते मुख्यमंत्री म्हणत आहे, कारण हे सरकार नक्की कोसळणार, असे भाकित त्यानी केले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता प्रकल्प काय आहे? असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. प्रकल्प कुठे गेला याचे त्यांना काहीच नाही. त्यांच्या उद्योगमंत्र्यांना माहीतही नाही की हा प्रकल्प कसा गेला! राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी मिळाली असती. मुख्यमंत्री अनेक वेळा दिल्लीला गेलेला आहात आणि दिल्लीसमोर जाऊन झुकून आलेला आहात. आता महाराष्ट्रासाठी एकदा दिल्लीला जा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला.

शिंदे गटाला आव्हान
रत्नागिरीच्या चिपळूण शहरामध्ये भर पावसात आदित्य ठाकरे यांची सभा झाली. तिथे त्यांनी शिंदे गटाला थेट आव्हानच दिले. गद्दारीचा शिक्का पुसायचा असेल तर या 40जणांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला समोरे जावे. तुम्ही तसे केले तर, मीही वरळीच्या आमदारकीचा राजीनामा देतो, असे ते म्हणाले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -