आदित्य ठाकरेंची निष्ठायात्रा, महाराष्ट्र पिंजून काढण्याचा मानस

एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे महापालिकेतील नगरसेवक फोडायला सुरुवात केली आहे. यानंतर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढणार आहेत.

Aditya Thackeray

एकनाथ शिंदे यांनी आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे महापालिकेतील नगरसेवक फोडायला सुरुवात केली आहे. ही गळती रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. बंडखोरांना धड शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे स्वत: राज्यभर फिरून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून शिवसेनेची संघटना पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करणार आहेत. या दौऱ्याला निष्ठा यात्रा असे नाव देण्यात आले आहे.

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा –

या ‘निष्ठा यात्रेत’ आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे यांचे मुख्य लक्ष्य मुंबई महानगरपालिका असून ते मुंबईतील २३६ शाखांना भेटी देणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या माध्यमातून आदित्य ठाकरे शिवसेनेच्या २३६ शाखा, गटप्रमुख, शाखाप्रमुख, कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणार आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे –

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एक दिवसाआड शिवसेना भवनात हजेरी लावत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील विविध गटांच्या बैठका घेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वेळ पडल्यास वेगळे चिन्ह घेऊन लढायची तयारी ठेवा, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी सेना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर –

संजय राऊत हे (शुक्रवार) आजपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातीलाच राऊतांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शिवसेना भविष्यात उभारी घेईल, असे भाकीत वर्तविले आहे. सरकार बदलले असले तरी आमच्यासाठी संपूर्ण आकाश खुले आहे. आता शिवसेना जी गरुडभरारी किंवा वाघाची झेप घेईल, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पकडीत येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील लोक चिडून उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. मातोश्रीच्या पाठीत असा खंजीर कसा खुपसला जाऊ शकतो? बाळासाहेबांच्या पुत्राशी अशी दगाबाजी कशी होऊ शकते?, हे प्रश्न जनतेला पडले आहेत. मातोश्रीने ज्यांना भरभरून दिले, ते असे वागले, हे लोकांना पसंत पडलेले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.